चाळीतून कांदा थेट उकीरड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 04:51 PM2019-01-12T16:51:57+5:302019-01-12T16:52:10+5:30
भाव कवडीमोल : वाहतूक खर्चही परवडत नसल्याने शेतकरी हवालदिल
देवळा : उन्हाळी कांद्याचे कोसळलेले बाजारभाव, चाळीतील सडलेल्या कांद्यामुळे झालेले आर्थिक नुकसान यामुळे शेतकरी संकटात सापडलेले असतांनाच आता चाळीतील कांदा बाजारात विक्रीसाठी आणणे देखील परवडेनासे झाल्यामुळे कांदा उकीरड्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
देवळा तालुक्यातील अनेक शेतक-यांनी चाळीतील कांदा उकीरड्यावर टाकून दिला आहे. पोळ कांद्याची आवक सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे त्याचे देखील बाजार भाव कोसळले आहेत, यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांच्या मागे लागलेली साडेसाती संपायचे नाव घेत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. चाळीतील उन्हाळी कांद्याचे जागेवर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी व पोळ कांद्याला हमीभाव द्यावा अशी मागणी शेतक-यांकडून होत आहे. सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवत गतवर्षी उन्हाळी कांद्याचे विक्र मी उत्पादन निघाल्यानंतर चांगला भाव मिळेल या मोठ्या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतक-यांनी हा कांदा चाळीत साठवून ठेवला होता. शासनाने नवीन कांदा चाळी बांधण्यासाठी दिलेले प्रोत्साहन, त्यासाठी दिलेले अनुदान याचा सकारात्मक परिणाम होऊन बहुसंख्य शेतक-यांनी हयाचा लाभ घेत नवीन चाळी तयार केल्या. यामुळे थोडेफार अपवाद सोडले तर प्रत्येक शेतक-याकडे स्वत:ची कांदा चाळ तयार झाली. यामुळे सर्व शेतक-यांनी कांदा चाळीत साठवणुक करण्यावर भर दिला.परंतु कांद्याच्या बाजारभावातील अस्थिरतेमुळे चाळीतील उन्हाळी कांदा विकण्यासंदर्भात शेतकरी संभ्रमात पडले होते. त्यातच सोशल मिडियावर कांद्याच्या बाजार भावासंदर्भात दररोज येणा-या वेगवेगळ्या पोस्टमुळे शेतक-यांच्या अपेक्षा वाढून तर संभ्रम अधिकच वाढला. अनेक शेतक-यांना कांदा विक्री करण्यासंदर्भात निश्चित निर्णय घेता आला नाही. ज्या शेतक-यांकडे कांदा साठवणुक करण्याची सोय नव्हती त्यांचाच कांदा बाजारात विक्रि साठी येत होता. यामुळे त्याकाळात बाजारात कांद्याची आवक देखील कमी झाली. परंतु बाजार काही वधारले नाहीत. मिळेल त्या भावात कांदा विकण्याची वेळ शेतक-यांवर आली. त्यातच नवीन पोळ कांद्याचे बाजारात झालेल्या दमदार आगमनाचा उन्हाळी कांद्याला फटका बसला.