कांद्याचा भडका अन् मोदींचा तडका
By Admin | Published: October 9, 2014 01:44 AM2014-10-09T01:44:03+5:302014-10-09T01:57:02+5:30
कांद्याचा भडका अन् मोदींचा तडका
नाशिक : कांद्याचे भाव कोसळण्यापासून तर कांदा निर्यातबंदीपर्यंत सर्वच पातळ्यांवर केंद्र सरकारला कोंडीत पकडू पाहणाऱ्या राष्ट्रवादीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मितभाषी मात्र तितक्याच आक्रमक भाषणाने चांगलाच ‘तडका’ दिल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात आहे.
देशाच्या पंतप्रधानांची ३० वर्षांनंतर नाशिकला होत असलेली सभा आणि तिचे राजकीय भांडवल करण्यासाठी आसुसलेली भाजपा आणि राष्ट्रवादीची मंडळी पाहता ही सभा गाजण्याची चिन्हे होती. मुळातच ती पावसाने एकदा रद्द झाल्याने दोन दिवसांनंतरही पावसाच्या सरी सुरू असल्याने होते की नाही इथपासून संशय व्यक्त केला जात होता. कांद्याचे भाव कोसळण्यास सर्वस्वी केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे चित्र सहकार व कृषी क्षेत्रात तयार होऊ लागले होेते. त्यातच नरेंद्र मोदींचे भाषण सुरू झाले आणि कांदा प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी तयारीत असलेल्या काही स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या दोघा-तिघांनी कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे, या फलकासह घोषणा दिल्या. चाणाक्ष मोदींनी ते हेरले. वस्तुत: कांदा व द्राक्षाच्या प्रश्नावर ते बोलणारच होते. त्यासाठी त्यांनी कांदा निर्यातबंदीची आणि निर्यातमूल्य वाढविल्याची जी संख्या बोलून दाखविली, त्यावरूनच ते स्पष्ट होते. मात्र कांद्याच्या हमीभावाचा व कांदा भाव कोसळण्याचा भडका झालेला आहे, हे ओळखून मोदींनी लगोलग आपल्या चार महिन्यांच्या काळात कधीही कांदा निर्यातबंदीचा निर्णय झाला नाही, विरोधक अत्यंत बेजबाबदार व खोटा आरोप करीत असल्याचे सांगत शेतकऱ्यांचा राग थंड करण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)