चाळीत साठवलेला कांदा असुरक्षित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 07:28 PM2020-11-04T19:28:14+5:302020-11-05T02:35:21+5:30
कळवण : कांदा पिकाला समाधानकारक भाव असल्यामुळे उच्चांक गाठण्याच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण आहे. ज्या शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवला ...
कळवण : कांदा पिकाला समाधानकारक भाव असल्यामुळे उच्चांक गाठण्याच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण आहे. ज्या शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवला आहे, त्यांना चार पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली. मात्र आता कांद्याच्या वाढलेल्या भावांमुळे चोरट्यांची त्यावर वक्रदृष्टी पडली असून, कळवण तालुक्यात भेंडी शिवारात एक लाख २५ हजार रुपयांचा २५ क्विंटल कांदा चोरी झाल्याची घटना मंगळवारी (दि. ३) रात्री घडली.
येथील राजकुमार देवरे यांची नवी बेज व भेंडी शिवारात शेती आहे. भेंडी शिवारातील शेतातील चाळीत कांदा साठवणूक केली आहे. कांदा चाळीतून एक लाख २५ हजार रुपये किमतीचा साठवलेला २५ क्विंटल कांदा अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. देवरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे, पोलीस कर्मचारी बोरसे, घरटे यांनी भेट देऊन कांदा चाळीची पाहणी व पंचनामा केला, पिकअप वाहनातून कांदा चोरी झाल्याचा पोलिसांचा कयास असून, वाहतूक मार्गावरून माहीतगार व्यक्तीकडून ही चोरी झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.
बुधवारी (दि. ४) सकाळी शेतातील सालदार रामदास माळी निकम यांच्या निदर्शनास ही बाब आली. कळवण पोलीस स्टेशनला कांदा चोरीला गेल्याची फिर्याद दिली.
राजकुमार देवरे यांनी मेहनतीने उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतले. बाजारात कांद्याच्या दरात चढउतार होत असल्याने व निश्चित भाव नसल्याने भविष्यात कांद्याचे बाजारभाव वाढतील व आपल्याला भाववाढीचा फायदा होऊन दोन पैसे मिळतील या अपेक्षेने देवरे यांनी भेंडी शिवारातील शेतातील चाळीत २५० क्विंटल कांदा साठवून ठेवला होता. मंगळवारी (दि. ३) अज्ञात चोरट्यांनी चाळीचा दरवाजा व जाळी तोडून चाळीतुन २५ क्विंटल कांदा लंपास केला. आजच्या बाजारभावानुसार ५००० रुपये क्विंटलप्रमाणे १ लाख २५ हजार रुपये किमतीचा कांदा चोरी गेला आहे.
चाळींवर गस्त...
यंदा कांद्याला समाधानकारक भाव असल्याने आता चोरट्यांनी या लाल सोन्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. जिल्ह्यात अन्य ठिकाणीदेखील कांदा चोरीच्या घटना समोर आल्याने शेतकऱ्यांना रात्री जागून कांदा चाळ राखावी लागते आहे.