एप्रिलमध्ये कांदा अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर : दादा भुसे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 03:30 PM2023-03-23T15:30:30+5:302023-03-23T15:31:02+5:30
वाजगाव येथे कृषी पर्यटन केंद्राचे उद्घाटन
संजय देवरे
देवळा (जि. नाशिक) : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एप्रिल महिन्यात कांदा अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातील, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. वाजगाव येथे एका कृषी पर्यटन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार दिलीप बनकर होते. यावेळी मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्र बापू पाटील, शंकरराव सावंत, जिल्हा बँकेचे माजी संचालक यशवंत आहिरे, मविप्रचे माजी संचालक डॉ. विश्राम निकम, अशोक पवार, के. एन. आहिरे, मालेगाव बाजार समितीचे माजी चेअरमन राजेंद्र जाधव, सतीश सुराणा, डॉ. यतीन कापडणीस आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्राच्या संचालिका अंजना केवळ देवरे व पद्मा बाळासाहेब देवरे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते फीत कापून व बैलजोडीचे पूजन करून कृषी पर्यटन केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. शेतकरी, विद्यार्थी आणि पर्यटक अशा सर्वच घटकांसाठी हे केंद्र लाभदायी असून, शेती आणि शिक्षण यांची सांगड यातून घातली जावी, अशी अपेक्षा ॲड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केली. आ. दिलीप बनकर यांनी ग्रामीण अर्थकारणाला बळ मिळण्यासाठी असे शेतीपूरक प्रयोग करण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ. विश्राम निकम यांनी आभार मानले.
कांदा नियोजनाबाबत समिती स्थापन
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेती करत असताना नवनवीन पर्याय शोधत व्यावसायिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यायला हवे. शेतकरी कुटुंबातील महिलांना सन्मान देत त्यांचेही नाव सातबाऱ्यावर यायला हवे. यामुळे योजनांचा लाभ घ्यायला सोपे जाते. कांदा या नगदी पिकावर शेतकऱ्यांचा जास्त भर असल्याने कांद्याबाबत दीर्घकालीन नियोजन व धोरण आखण्यासाठी शासनपातळीवर समिती गठित करण्यात आलेली असल्याची माहितीही पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.