कांदा व्यापाऱ्यांनीच शेतकऱ्यांना वेठीस धरलंय, राधाकृष्ण विखे-पाटलांचा आरोप
By संकेत शुक्ला | Published: July 27, 2024 06:25 PM2024-07-27T18:25:22+5:302024-07-27T18:31:40+5:30
नाशिक येथे पक्षाच्या अंतर्गत आढावा बैठकीसाठी आले असता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला.
नाशिक : भारतीय कांद्याला जगभरात मोठी बाजारपेठ आहे. आजही निर्यातीसाठी ५ लाख कांद्याची गरज आहे. शेतकऱ्यांकडे कांद्याचा साठाही आहे. परंतु व्यापाऱ्यांनी निर्यात मूल्याच्या मुद्द्यावर कांदा अडवून ठेवला आहे. शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम व्यापाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
नाशिक येथे पक्षाच्या अंतर्गत आढावा बैठकीसाठी आले असता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला. ते म्हणाले की कांद्याच्या दराबाबतच शेतकरी आणि व्यापारी असे दोन मतप्रवाह आहेत. ते शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक आहे. निर्यातीसाठी कांदा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. निर्यातमूल्य कमी करण्यासाठी पीयूष गोयल यांच्याकडे मागणी केली आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल असेही ते म्हणाले.
शरद पवार यांनी अमित शहा यांच्यावर केलेल्या टिकेविषयी विचारले असता पवार सध्या वैफल्यग्रस्त आहेत. ज्येष्ठ नेत्याने अशी टीका करू नये. बॉम्बस्फोटातील आरोपी समवेत त्यांनी केलेला विमान प्रवास सगळ्यांनाच ज्ञात आहे. परंतु आता अशा टीका करणे योग्य नाही. त्यांनीही याची जाण ठेवायला हवी अशी अपेक्षा विखे पाटील यांनी व्यक्त केली. लोकसभेला वेगळे चित्र होते, आता विधानसभेत वेगळे असेल, राज्यात नक्कीच महायुतीचे सरकार येईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
लाडकी बहीण साठी निधीची कमतरता नाही
राज्य शासनाने जाहीर केलेली लाडकी बहीण योजना सादर करण्यापूर्वी अर्थ खात्याशी संवाद साधला नाही, या योजनेसाठी पैसे नाहीत अशा चर्चा सुरू असताना महसूल मंत्री विखे पाटील यांनी मात्र त्याचा साफ इन्कार केला आहे. राज्य शासनाकडे पुरेसा पैसा आहे. निधीची कोणतीही चिंता नाही. ठरवल्यानुसार बहिणींच्या खात्यात रक्कम नक्कीच येईल असा दावाही त्यांनी केला.
शरद पवारांवर टीका
शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत.त्या काळात त्यांनी काय केलेले हे सर्वांना माहीत आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी काय केले हे त्यांनी सांगावे. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायची हाच त्यांचा आजवरचा उद्योग असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.