लक्ष्मीपूजनाला केले कांद्याचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 12:42 AM2020-11-16T00:42:17+5:302020-11-16T00:42:41+5:30
मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदाच आपली लक्ष्मी आहे. यावरच आपले कुटुंब अवलंबून असते म्हणत नैताळे येथील शेतकरी संजय साठे दांपत्याने लक्ष्मीपूजनाला कांद्याचे पूजन करत दिवाळी साजरी केली.
सायखेडा : मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदाच आपली लक्ष्मी आहे. यावरच आपले कुटुंब अवलंबून असते म्हणत नैताळे येथील शेतकरी संजय साठे दांपत्याने लक्ष्मीपूजनाला कांद्याचे पूजन करत दिवाळी साजरी केली.
तीन वर्षांपासून दुष्काळ आणि अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातच सरकारच्या निर्णायाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गतवर्षी संजय साठे यांनी मातीमोल किमतीत कांदे विकून आलेल्या पैशांची पंतप्रधानांना मनिआर्डर केली होती. आज पुन्हा शेतकरीवर्गाच्या व्यथा सरकार दरबारी पोहोचाव्या म्हणून आपल्या कांदाचाळीला सजवून साठे दांपत्याने कांद्याचे विधिवत पूजन करत ‘या सरकारला शेतकरीवर्गासाठी पूरक निर्णय घेण्याची बुद्धी दे, बाहेरचा कांदा देशात नको. आपला कांदा पूर्ण देशाला पुरेल इतका असतांना असा अट्टाहास कशासाठी, हवे तर सरकारने कांदा खरेदी करत रेशनवर ग्राहकांना द्यायला हवा, अशी प्रार्थना देवाकडे केली.
शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी करत कांदा पीक घेतो मात्र पिकाला निसर्गाचा फटका बसला. जे पीक हाती आले ते शासनाच्या निर्णायामुळे मातीमोल दराने विकण्याची वेळ आली आहे. शासनाने शेतकऱ्यांचा गांभीर्याने विचार करावा यासाठी सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी कांद्याचे पूजन केल्याचे संजय साठे यांनी सांगितले.