ऑनलाइनमुळे लसीकरणापासून स्थानिक नागरिक वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 11:55 PM2021-05-08T23:55:40+5:302021-05-09T00:14:40+5:30
पाळे खुर्द : ऑनलाइन रजिस्ट्रेशनमुळे लसीकरणापासून स्थानिक नागरिक वंचित राहत असून नाशिक जिल्ह्यातील तसेच बाहेरील जिल्ह्यातील नागरिक कळवण येथे ...
पाळे खुर्द : ऑनलाइन रजिस्ट्रेशनमुळे लसीकरणापासून स्थानिक नागरिक वंचित राहत असून नाशिक जिल्ह्यातील तसेच बाहेरील जिल्ह्यातील नागरिक कळवण येथे येऊन लसीकरण करून घेत आहेत. बाहेरील नागरिकांना लस देणे बंद करून फक्त कळवण तालुक्यातील स्थानिकांनाच प्राधान्य द्यावे, अशी मागणी करीत कळवण तालुका भाजपाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
कळवण तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना दि. १ मेपासून कोव्हॅक्सिन लस उपलब्ध झाली आहे. शासनाने जाहीर केल्यानुसार १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून आपले केंद्र आरक्षित करावे लागत आहे. मात्र, कळवण तालुक्यातील नागरिकांना ऑनलाइन रजिस्ट्रेशनमुळे लसीकरणापासून वंचित राहावे लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दि. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार दिवसाला १०० जणांचे लसीकरण करण्यास आरोग्य विभागाला परवानगी असताना कळवण उपजिल्हा रुग्णालयात ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलेले नागरिक मुंबई, डहाणू, शिर्डी, नाशिक, मनमाड, सटाणा आदी शहरांमधून येऊन लसीकरण करून घेत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करूनही त्यांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत असल्याने शासनाने लागू केलेल्या ऑनलाइन सेवेवर नाराजी व्यक्त केली आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांनी पहिला डोस घेतला असून काही नागरिकांनी पहिला डोस घेऊन जवळ जवळ २ महिने उलटले तरी त्यांना दुसरा डोस मिळत नसल्याने त्यांना रोज वणवण फिरावे लागत आहे.
कळवण तालुक्यात फक्त उपजिल्हा रुग्णालय, नवीबेज प्राथमिक आरोग्य व ओतुर प्राथमिक आरोग्य केद्रांवर लसीकरण करण्यात येत होते; परंतु काही दिवसांपासून कळवण उपजिल्हा वगळता तेथेही लस उपलब्ध नसल्याने नागरिकांचा हिरमोड होत आहे.
वैद्यकीय अधीक्षक मात्र घरी...
कळवण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरदसिंग परदेशी यांच्याबद्दल नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असून लसीकरणाच्या दिवशी ते केंद्रावर उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. शनिवारी (दि.८) उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक यांच्या कार्यालयास कुलूप दिसून आले, अधिक चौकशीत ते आपल्या घरी नाशिक येथे असल्याचे सांगण्यात आले.
पहिला डोस घेऊन ४५ दिवसांच्या वर कालावधी लोटूनही अनेकांना दुसरा डोस मिळालेला नाही, त्यामुळे अनेक वयोवृद्ध नागरिक भयभीत झालेले आहेत. तसेच १८ ते ४४ वयापर्यंत गटाला ऑनलाइन जो १०० लसींचा कोटा दिलेला आहे, त्यात बरेच नाशिक, संगमनेर, शिर्डी, मनमाड येथील नागरिक लसीकरणासाठी कळवणला येत आहेत. त्यामुळे कळवणमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती नाकारता येत नाही.
- डॉ. अनिल महाजन.