आषाढी पायी वारी नसल्याने ऑनलाइन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 07:22 PM2020-06-15T19:22:06+5:302020-06-15T19:31:14+5:30
पायी आषाढी वारी होणार नसल्याने काही तरुणांनी समाज माध्यमातून वारीसाठी डिजिटल व्यासपीठ खुले केले आहे . काही तरुण मित्रांनी एकत्र येत ऑनलाइन ' अक्षय ज्ञानेश्वरी पारायण ' या नावाने अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
नाशिक : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदा पायी आषाढी वारी होणार नसल्याने काही तरुणांनी समाज माध्यमातून वारीसाठी डिजिटल व्यासपीठ खुले केले आहे . काही तरुण मित्रांनी एकत्र येत ऑनलाइन ' अक्षय ज्ञानेश्वरी पारायण ' या नावाने अभिनव उपक्रम सुरू केला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाला शहरास जिल्ह्यातील भाविकांचा प्रतिसाद लाभत आहे.
दरवर्षी आषाढी वारीसाठी वारकरी मोठ्या प्रमाणावर पंढरपूर येथे रवाना होतात .यंदा मात्र कोरोनामुळे पायी वारी होणार नाही . तसेच जे वारकरी पंढरपूर येथे वारीसाठी जाऊ शकत नाहीत, ते आपल्या घरीच ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे पारायण करतात. त्याचप्रमाणे वारी दरम्यान वारकरी ज्ञानेश्वरीचे पारायण करतात ,अशीही एक परंपरा आहे . ही परंपरा लक्षात घेऊन डिजिटल माध्यमातून आपल्याला पारायण सुरु करता आले तर अनेक वारकरी आणि भाविकांना यात सहभागी होता येईल , असा विचार करून युवक अक्षय भोसले आणि त्याच्या मित्रांनी फेसबुक पेजवर ऑनलाइन ' अक्षय ज्ञानेश्वरी पारायण ' या नावाने अभिनव उपक्रम सुरू केला आहे .या उपक्रमाला प्रतिसाद देत कमी कालावधीतच हजारो भाविकांनी पारायणासाठी नोंदणी केली . वारीच्या काळात दररोज सकाळी दहा ते अकरा या वेळेत अक्षय वारीच्या डिजिटल व्यासपीठावर हजारो भाविक एकाच वेळी माऊलीच्या ज्ञानेश्वरीचे पारायण करणार आहेत . या दरम्यान भाविकांनी ज्ञानेश्वरीचे पारायण आपापल्या घरीच करायचे असून त्याद्वारा त्यांना ज्ञानेश्वर माऊलीच्या अमृतमय शब्दांच्या सानिध्याचा लाभ मिळणार आहे.