शुल्क वसुलीसाठी ऑनलाइन शिक्षण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:14 AM2021-04-16T04:14:29+5:302021-04-16T04:14:29+5:30
नाशिक : कामठवाडे परिसरातील एका शाळेने शालेय शुल्क वसुलीसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद केले आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे ...
नाशिक : कामठवाडे परिसरातील एका शाळेने शालेय शुल्क वसुलीसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद केले आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे संकट असताना पालक ५० टक्के शुल्काची रक्कम देण्यास तयार असतानाही शाळांकडून संपूर्ण शुल्कासह अतिरिक्त शुल्काची मागणी होत असल्याने पालक शुल्क अदा करू शकले नाहीत. त्यामुळे शाळेने काही विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लास बंद केले आहेत.
सोसायट्यांमध्ये सामूहिक कार्यक्रम
नाशिक : कोरोनाचे संकट वाढत असतानाही इंदिरानगर परिसरातील काही सोसायट्यांमध्ये सामूहिक कार्यक्रम रंगत आहेत. अशा कार्यक्रमांमुळे कोरोना विषाणूचा प्रसार वाढण्याची भीती आहे. त्यामुळे सोसायट्यांमधून होणारे सामूहिक कार्यक्रम बंद करण्यासाठी पोलिसांनी कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग सुरू
नाशिक : राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने नववीच्या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दहावीत प्रवेशित विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. गेल्या वर्षात कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नव्हता. त्यामुळे या वर्षी शाळांनी आतापासूनच ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत.
भाजीपाला विक्रेत्यांकडून प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन
नाशिक : इंदिरानगर भागात भाजी विक्रेत्यांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजी विक्रेते सॅनिटायझर, मास्क वापराकडे दुर्लक्ष करीत असून ग्राहकांची गर्दी नियंत्रित न करता मालाची विक्री करीत असल्याने कोरोना विषाणूचा प्रसार वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाचे उल्लंघन
नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे शुल्क भरू न शकणाऱ्या शाळांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद करू नये, असे स्पष्ट आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. मात्र काही शाळांकडून शुल्कवसुलीसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात जॉइन करून घेतले जात नसल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.