मनपाच्या शाळेतही ऑनलाइन शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 09:33 PM2020-04-22T21:33:29+5:302020-04-23T00:18:47+5:30
नाशिक : सध्या सुरू असलेल्या लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे शाळांना सुट्या आहेत. मात्र, त्यानंतरही जवळपास सर्वच खासगी शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना मोबाइलद्वारे शिक्षण देत आहेत.
नाशिक : सध्या सुरू असलेल्या लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे शाळांना सुट्या आहेत. मात्र, त्यानंतरही जवळपास सर्वच खासगी शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना मोबाइलद्वारे शिक्षण देत आहेत. मात्र, महापालिकेच्या आनंदवली येथील शाळेतील शिक्षिका सविता बोरसे पाचवीच्या मुलांचा नियमित अभ्यास आणि नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेचा सरावही आॅनलाइनच करून घेत आहेत. अनेक शिक्षक अशाप्रकारचे प्रयोग करण्यासाठी प्रयत्न तर करीत आहेतच, परंतु शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक मनपा शाळांनी आॅनलाइन अर्ज उपलब्ध करून दिले आहेत.
नाशिक महापालिकेच्या ९० शाळा आहेत. त्यात सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. ही संख्या वाढविण्यासाठी महापालिकेकडून ई-लर्निंगसह अनेक साधनांचा वापर केला जात आहे. बाभळेवाडी शाळा पॅटर्न राबवण्यासाठी मध्यंतरी चाळीस शिक्षक प्रत्यक्ष अनुभव घेऊन आल्यानंतर त्यांनीदेखील प्रयोगशीलता दाखविण्यास सुरुवात केली आहे. त्यातच सध्या लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे मनपाच्या सर्व शाळा बंद आहेत. खासगी शाळा बंद असल्या तरी मोबाइल आणि विविध लिंक्सद्वारे शिक्षण दिले जात आहे. तसे महापालिकेत देण्याचे प्रयत्न होत आहेत. आनंदवलीतील शिक्षिका सविता बोरसे यांनी पाचवीतील सव्वाशे मुलांचा अभ्यास बुडू नये यासाठी पालकांचा मोबाइल क्रमांक घेऊन व्हॉट्सअॅप गु्रप तयार केले आहेत. त्यावर प्रश्नावली टाकून मुलांकडून ती भरून घेतली जात आहे. त्यामुळे मुलांचा अभ्यास सुट्टीतही सुरूच आहे. मुलांना नियमित प्रश्नावली पाठविल्यानंतर त्यांना काही शंका असल्यास त्याचेही निरसन केले जात आहे.