मनपाच्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 11:29 PM2020-07-22T23:29:25+5:302020-07-23T00:54:49+5:30
खासगी शाळांच्या तुलनेत महापालिका शाळांमधील विद्यार्थी मागे पडू नये यासाठी प्रशासनानेदेखील आॅनलाइन शिक्षणावर भर दिला आहे. पोलीस मुख्यालयात महापालिकेने खास स्टुडियो तयार केला असून, त्यात शिक्षक पाठ्यक्रमांचे व्हिडिओ तयार करून ते व्हॉट्सअॅपवर पाठवत आहेत, तर काही मुलांसाठी आॅडिओ क्लीपचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.
नाशिक : खासगी शाळांच्या तुलनेत महापालिका शाळांमधील विद्यार्थी मागे पडू नये यासाठी प्रशासनानेदेखील आॅनलाइन शिक्षणावर भर दिला आहे. पोलीस मुख्यालयात महापालिकेने खास स्टुडियो तयार केला असून, त्यात शिक्षक पाठ्यक्रमांचे व्हिडिओ तयार करून ते व्हॉट्सअॅपवर पाठवत आहेत, तर काही मुलांसाठी आॅडिओ क्लीपचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोनामुळे यंदा शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. शाळेत मुलांना बोलवता येत नसल्याने शासनानेच आता आॅनलाइन एज्युकेशनवर भर दिला आहे. खासगी शाळांमध्ये ते सुरू झाले आहे. मात्र, त्याचबरोबर नाशिक महापालिकेनेदेखील त्यात पुढाकार घेतला आहे. या शाळांमध्ये येणारे विद्यार्थी गरीब असल्याने त्यांच्या पालकांशी चर्चा करून आणि त्यांचे व्हॉट्सअॅप गु्रप करण्याबरोबरच अन्य माहितीदेखील संकलित करण्यात आली आहे. या मुलांना पाच लाख ९४ हजार ९२० पुस्तकांचे घरपोहोच वितरण करण्यात आले असून, त्यानंतर आता त्यावर आधारित आॅनलाइन शिक्षण सुरू करण्यात आल्याची
माहिती शिक्षण विभागाच्या उपआयुक्त अर्चना तांबे यांनी
दिली.
महापालिकेच्या एकूण ९० शाळा असून, २४ हजार ७७८ विद्यार्थी त्यात शिक्षण घेत आहेत. त्याच्या आधारे महपालिकेने डेटाबेस तयार केला आहे. त्यातील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन असून, त्यावर व्हॉट्सअॅप आहे, अशा पालकांचे ग्रुप तयार करण्यात आहेत. त्यात शिक्षकांनी तयार केलेले शिक्षणक्रमाचे जास्तीत जास्त तीस मिनिटांचे व्हिडिओ शेअर केले जातात. हे व्हिडिओ वेगवेगळ्या विषयांचे असल्याने विद्यार्थी ते सहज बघतात. विशेष म्हणजे व्हिडिओ तयार करण्यासाठी महापालिकेने पोलीस मुख्यालयातील शाळा क्रमांक १६ मध्ये खास स्टुडियो तयार केला आहे. शिक्षक या ठिकाणी वेळापत्रकानुसार जाऊन आपापल्या विषयांचे अध्यापनाचे व्हिडिओ तयार करतात.
महापालिकेच्या सर्वेक्षणात काही मुलांच्या पालकांकडे स्मार्टफोन नसून केवळ साधे फोन आहेत. त्यामुळे त्यावर व्हिडिओ पाठवता येत
नाही.
अशा मुलांना अध्यापनात अडचण येऊ नये यासाठी आॅडिओ क्लिपद्वारे शैक्षणिक साहित्य तयार करण्यात आले आहे. संबंधित विद्यार्थ्याने शिक्षण मंडळाने दिलेल्या मोबाइल नंबरवर मिस कॉल दिल्यास त्यावरून कॉल येतो आणि डायलर टोनप्रमाणेच त्यातून विविध विषयांची आॅडिओ क्लिप सुरू होते. त्यामुळे स्मार्ट फोन नसतांनाही अशा मुलांना शालेय अभ्यास करणे सोपे जाते.
पाच हजार मुलांकडे मोबाइलच नाही !
मनपा शाळेतील पाच हजार मुलांकडे कोणत्याही प्रकारचा मोबाइल नाही त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची अडचण आहे. सध्या अनेक शिक्षक दानशूरांकडून मोबाइल मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. एका कंपनीने सीएसआरमधून दोनशे टॅब दिले आहेत. मात्र, कंपनीने कोरोनामुळे त्याचे वितरण थांबवले आहे. तथापि, मोबाइल नसलेल्या मुलांसाठी सध्या शासनाने दूरचित्रवाणीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. २४ हजारपैकी १७ हजार मुलांकडे टीव्ही असल्याने शासकीय वाहिन्यांचा त्यांना लाभ होत आहे.