चांदवडला विद्यार्थ्यांची आॅनलाइन परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 10:23 PM2020-04-03T22:23:05+5:302020-04-03T22:23:19+5:30
एसएनजेबी संचलित स्व. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात इच्छा असेल तर मार्ग दिसेल या उक्तीचा उत्कृष्ट अनुभव येत आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांची घरबसल्या आॅनलाइन परीक्षा घेण्यात आली.
चांदवड : येथील एसएनजेबी संचलित स्व. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात इच्छा असेल तर मार्ग दिसेल या उक्तीचा उत्कृष्ट अनुभव येत आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांची घरबसल्या आॅनलाइन परीक्षा घेण्यात आली.
कोरोनाचे गडद संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू केलेल्या संचारबंदीने विद्यापीठे व महाविद्यालयांना १४ एप्रिलपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. परीक्षा तोंडावर आल्या असून अपूर्ण राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी प्राध्यापकांवर येऊन ठेपली होती. अपूर्ण राहिलेल्या अभ्यासक्रमांसाठी आॅनलाइन टीचिंगवर प्राध्यापकांनी जोर दिला. परीक्षा कशी घ्यायची हे मोठे आव्हान होते. सर्व विद्यार्थी आपल्या घरी व शिक्षकदेखील आपापल्या घरीच आहेत. या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून व्यवस्थापन मंडळ तसेच प्र्राचार्य महादेव कोकाटे व डॉ. महेश संघवी व त्यांच्या संपूर्ण चमूने ही परीक्षा गुगल क्लासरूमच्या सहाय्याने घ्यायचे ठरवले. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांची व पालकांची बैठकदेखील आॅनलाईन घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थी हे परीक्षार्थी असणार व व त्यांचे पालक हे सुपरवायझर व शिक्षक हे परीक्षक म्हणून काम करणार. या त्रिसूत्री पद्धतीने अतिशय काटेकोरपणे परीक्षेचे नियोजन करण्यात आले. त्यात आॅनलाइन-आॅफलाइन व आॅनलाइन या धर्तीवर या परीक्षेचे नियोजन केले गेले, साधारण सकाळी ९.३० वाजता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या. पुढील तीन तासात विद्यार्थ्यांनी ती प्रश्नपत्रिका संपूर्णपणे सोडवून पुढच्या पंधरा मिनिटात स्कॅन करून परत आपल्या लॉगिनमधून अपलोड केल्या, व विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिका प्राध्यापकांना त्यांच्या लॉगिनमध्ये तपासणीसाठी उपलब्ध झाल्या. या संपूर्ण विषयांच्या परीक्षांना विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक दिवशी किमान ९५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसोबतच्या प्रोजेक्ट सेमिनार इत्यादी आवश्यक बैठकादेखील आॅनलाइनच होत आहेत.
चांदवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने आॅनलाइन लर्निंगसाठी उपलब्ध सर्व टुल्सचा ज्या कौशल्याने उपयोग करून घेतला तो संपूर्ण शिक्षण क्षेत्रात एक मौलचा दगड ठरेल. विद्यार्थिदशेतच सर्व आॅनलाइन टुल्सचा उत्कृष्ट वापर केलेले विद्यार्थी उद्या इंडस्ट्रीलादेखील नवी दिशा देऊ शकतील, असा विश्वास आहे
- अरविंद महापात्रा, सीईओ व को. फाउण्डर नेटविन, नाशिक