सहा लाख शिधापत्रिकाधारकांना आॅनलाइन धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 04:06 PM2018-10-04T16:06:22+5:302018-10-04T16:06:54+5:30
नाशिक : रेशनवरील धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत करण्यात आलेल्या विविध बदलाचा भाग म्हणून सप्टेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्यातील सहा लाखांहून अधिक शिधापत्रिकाधारकांना रेशनमधून आॅनलाइन धान्य वितरण करण्यात आले आहे. आॅनलाइन धान्य वाटपात राज्यातील अन्य जिल्ह्यांत नाशिक जिल्ह्याचा १९वा क्रमांक असला तरी, राज्यात सर्वाधिक धान्य वाटपात नाशिकने अव्वलस्थान कायम ठेवले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून रेशनवरील धान्याचे वाटप ‘पॉस’यंत्राच्या सहाय्याने वाटप केले जात असून, सध्या ज्यांचे पॉस यंत्रावर बोटांचे ठसे उमटत नाहीत किंवा ज्यांची नोंदणी झालेली नाही अशांसाठी रूट आॅफिसर नेमून त्यांना धान्य वाटप केले जात आहे. जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख शिधापत्रिकाधारक असून, त्यातील सहा लाख ८ हजार ८४१ शिधापत्रिकाधारकांना गेल्या महिन्यात आॅनलाइन धान्य वाटप करण्यात आले आहे. राज्यात धान्य वाटपाचे मंजूर नियतानाचा विचार करता, १६,५०० मेट्रिक टन इतके धान्य आॅनलाइन वाटप करून नाशिक जिल्ह्याने अव्वल स्थान कायम ठेवले आहे. आॅक्टोबर महिन्यात उर्वरित दीड लाख शिधापत्रिकाधारकांना आॅनलाइनप्रणालीत आणण्यासाठी काय करता येईल यासाठी पुरवठा विभाग प्रयत्नशील आहे.