कृषी विज्ञान संकुलात प्रथम शैक्षणिक सत्राचे ऑनलाईन उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:13 AM2021-04-06T04:13:47+5:302021-04-06T04:13:47+5:30
मालेगाव : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत काष्टी येथील पाच कृषी महाविद्यालयांपैकी पहिल्या महाविद्यालयाच्या प्रथम शैक्षणिक सत्राचे उद्घाटन ...
मालेगाव : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत काष्टी येथील पाच कृषी महाविद्यालयांपैकी पहिल्या महाविद्यालयाच्या प्रथम शैक्षणिक सत्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कृषी विज्ञान संकुल मालेगावच्या विकासात नावलौकिक मिळवेल, असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.
कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील प्रथम शैक्षणिक सत्राचे उद्घाटन मंत्री भुसे यांच्या हस्ते पार पडले. सोहळ्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, कुलसचिव मोहन वाघ, प्रकल्प अधिकारी डॉ. विश्वनाथ शिंदे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, कृषी निष्ठा पुरस्कार प्राप्त शेतकरी विनोद जाधव, श्रीराम मिस्तरी, संजय दुसाने यांच्यासह कृषी महाविद्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भुसे म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठअंतर्गत साकारण्यात येणारे कृषी विज्ञान संकुल हे राज्यपातळीवर प्रथम क्रमांकाचे असेल. कृषीचा मान, प्रतिष्ठा वाढविण्यासाठी कृषी व्यवसाय व्यवस्थापन या पहिल्याच शासकीय महाविद्यालयाची सुरुवात होत आहे. या महाविद्यालयाच्या प्रथम सत्राचा उद्घाटन सोहळा मोठ्या स्वरूपात साजरा करण्याचे प्रस्तावित होते; परंतु कोरोनाच्या महामारीमुळे शासनाच्या निर्देशाचे पालन करत आज ऑनलाईन पद्धतीने छोटेखानी स्वरूपात हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आज या प्रकल्पाच्या माध्यमातून छोटे रोपटे रोवण्यात आले असून, भविष्यात विभागातच नाही तर संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांकाचे कृषी मार्गदर्शन केंद्र असेल, अशी ग्वाही भुसे यांनी यावेळी दिली. सूत्रसंचालन वरिष्ठ संशोधन सहायक डॉ. दिनेश बिरारी यांनी केले. आभार सहायक प्राध्यापक डॉ. संजय पाटील यांनी मानले.