महापालिकेत आता पुन्हा ऑनलाईन बैठकांचे सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:15 AM2021-02-24T04:15:33+5:302021-02-24T04:15:33+5:30
नाशिक : कोरोना संसर्ग वाढू लागताच नाशिक महापालिकेने पुन्हा ऑनलाईन बैठका घेण्याचे निश्चित केले असून त्यानुसार आयुक्त कैलास जाधव ...
नाशिक : कोरोना संसर्ग वाढू लागताच नाशिक महापालिकेने पुन्हा ऑनलाईन बैठका घेण्याचे निश्चित केले असून त्यानुसार आयुक्त कैलास जाधव यांनी आदेशही जारी केले आहेत. त्यामुळे स्थायी समितीसह अन्य सर्वच समित्यांच्या बैठका आता ऑनलाईन होणार आहेत. गेल्या वर्षी कोरोनाचे संकट आल्यानंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्व बैठका रद्द करतानाच आवश्यक त्या बैठका ऑनलाईन घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.
मात्र, गेल्या महिन्यात राज्य शासनाने महासभा वगळता अन्य सर्व सभा ऑफलाईन म्हणजेच सदस्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत घेण्यात येतील असे आदेश दिले. त्यामुळे बैठकांचा धडाका सुरू होता. परंतु त्याच बरोबर आरोग्य नियमांचे पालन होत नव्हते. स्थायी समितीच्या अनेक बैठका अगोदरच ऑनलाईन असूनही नगरसेवक प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित राहत हेाते. त्याच बरोबर आरोग्य नियमांचे पालनदेखील केले जात नव्हते. प्रभाग समित्यांच्या बैठकांमध्ये देखील असाच अनुभव होता. जानेवारी महिन्यात शासनाने महासभा वगळता अन्य सभा प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले हेाते. मात्र, ऑनलाईन सभांमध्ये तांत्रिक अडचणी येतात त्यामुळे प्रत्यक्ष सभा घ्या यासाठी विरोधकांनी महापौरांकडे आग्रह धरला हेाता. त्यामुळे गेल्या १८ फेब्रुवारीस त्यांनी सभागृहात पन्नास नगरसेवकांच्या उपस्थितीत सभा घेण्याचे जाहीर केले हेाते.
दरम्यान, शहरात गेल्या दहा ते बारा दिवसांत कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने जमावबंदी लागू केल्याने निमित्त करून महासभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर आता महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनीदेखील आता महापालिकेच्या सर्व सभा ऑनलाईनच होतील असे आदेश जारी केले आहेत.