प्रभागाची ऑनलाईन सभा काही मिनिटांत उरकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:14 AM2021-03-27T04:14:32+5:302021-03-27T04:14:32+5:30
शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता सातपूर प्रभागाची ऑनलाईन सभा घेण्यात आली. विषयपत्रिकेवरील सहा विषय मंजूर करीत मयत कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण ...
शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता सातपूर प्रभागाची ऑनलाईन सभा घेण्यात आली. विषयपत्रिकेवरील सहा विषय मंजूर करीत मयत कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून सभा संपविण्यात आली. अवघ्या काही वेळात सभा आटोपती घेतल्याने संतप्त झालेल्या मनसेचे नगरसेवक सलीम शेख आणि शिवसेनेचे नगरसेवक भागवत आरोटे यांनी ताबडतोब विभागीय कार्यालय गाठले. कार्यालयात बसलेल्या प्रभाग सभापती रवींद्र धिवरे यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. कोरोनाकाळात वाढती रुग्णसंख्या, त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सातत्याने वाढणारे टपरीधारकाचे अतिक्रमण, पाणीप्रश्न, साफसफाई, दूषित पाण्याचा पुरवठा असे अनेक विषय असताना सभा आटोपती कशीकाय घेतली? असा जाब विचारला. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत खोका मार्केटमधील दोनशे कुटुंबीयांना बेघर करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून दुसरीकडे प्रशासनामुळे दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. तसेच ही काही कामे सुरू आहेत, ती अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत. त्यावर संबंधित अधिकारी देखरेख करीत नाहीत. म्हणून, अधिकारी आणि ठेकेदार दोघांवर आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक सलीम शेख यांनी यावेळी केली आहे. तर नगरसेवक भागवत आरोटे यांनीही प्रशासनावर गंभीर आरोप केले. ऑनलाईन घेतलेल्या सभेत २७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे.