आॅनलाइन मतदार स्लिप मिळणार
By Admin | Published: October 15, 2014 12:36 AM2014-10-15T00:36:09+5:302014-10-15T00:36:54+5:30
आॅनलाइन मतदार स्लिप मिळणार
नाशिक : शहरातील बहुतांश उमेदवारांनी मतदान केंद्रांवर मतदारांचे नाव शोधून देणे व त्यांना स्लिप देण्यासाठी संगणक व लॅपटॉपची व्यवस्था केली असल्याने आता पारंपरिक याद्या व चिठ्ठ्या मागे पडून मतदारांना आॅनलाइन मतदार स्लिप मिळणार आहे़
यापूर्वी होणाऱ्या मतदानप्रसंगी प्रत्येक मतदान बूथवर डझनभर कार्यकर्ते मतदार याद्यांचे गठ्ठे घेऊन बसलेले असत़ एखादा मतदार आला तर सर्वजण जीव तोडून सर्वच याद्यांत त्याचे नाव शोधत असत़ हा प्रकार खूप वेळखाऊ तसेच किचकट असल्याने अनेकजण मतदानापासून वंचित राहत होते.या सर्वांवर उपाय म्हणून प्रत्येक बूथवर इंटरनेट सज्ज एक संगणक अथवा लॅपटॉप देण्यात आला आहे़ या लॅपटॉपमध्ये त्या संपूर्ण मतदार याद्या फिड करण्यात आल्या आहेत़ संगणकात मतदाराचे नाव टाकले की लगेच त्याचा क्रमांक व मतदार यादी क्रमांक, फोटो यासह सर्व माहिती उपलब्ध होणार आहे़ प्रिंटरमधून लगेच ती स्लिप प्रिंट करून मतदारास देता येणार आहे़ कार्यकर्ते आपल्या स्मार्टफोनवरून मतदाराचे नाव शोधून देण्यास मदत करणार आहेत़