बारा दिवसांत केवळ ११ मिमी पाऊस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:18 AM2021-07-14T04:18:08+5:302021-07-14T04:18:08+5:30
हवामान खात्याकडून यंदा सरासरीपेक्षा अधिक शंभर टक्क्यांपर्यंत मान्सून बरसणार असल्याचा पूर्वअंदाज वर्तविला गेला होता. या अंदाजाने बळीराजासह सर्वांच्याच आशा ...
हवामान खात्याकडून यंदा सरासरीपेक्षा अधिक शंभर टक्क्यांपर्यंत मान्सून बरसणार असल्याचा पूर्वअंदाज वर्तविला गेला होता. या अंदाजाने बळीराजासह सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, वेळेवर मान्सूनची ‘एन्ट्री’ होऊनही अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस शहरासह जिल्ह्यात होऊ शकलेला नाही. यामुळे शेतकरी वर्गासह सर्वच धास्तावले आहेत. या वर्षी वरुणराजाने कृपादृष्टी न केल्याने कमालीची निराशा झाली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत प्रत्येक जण आकाशात दाटून येणाऱ्या ढगांकडे डोळे लावून बसला आहे. शहरालगत्या खेड्यांमधील मळे भागात, तसेच तालुकास्तरावरील गावांमध्येही काही शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे. यामुळे त्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
या हंगामात आतापर्यंत १११.९ मिमी पाउस पडला असून, यामध्ये जूनअखेर शहरात १०१.१ मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान केंद्राकडे आहे. जुलैच्या बारा दिवसांमध्ये केवळ ११ मिमी पाऊस झाला. हा आकडा मागील पाच वर्षांमधील जुलै महिन्यातील अत्यंत निराशाजनक पर्जन्यमान राहिले आहे. रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू ही सर्वच नक्षत्रे कोरडी गेली आहेत.
--इन्फो--
सहा वर्षांचे पर्जन्यमान (मिमीमध्ये)
वर्ष - जून - जुलै
२०१४- २६.२ - ३३१.९
२०१५- १३३.८ - ११६.७
२०१६- १२.४ - ४८१.९
२०१७- २४९.४ - ४८०.३
२०१८- १४६.० - २४४.१
२०१९- १०७.६ - ४९७.०
२०२०- ३६४.० - ८२.९
--इन्फो--
मागील वर्षी जुलैमध्ये ८२ मिमी पाऊस
मागील वर्षी जुलैअखेरपर्यंत ८२ मिमी इतका पाऊस शहरात पडल्याची नोंद हवामान केंद्राकडे आहे. या वर्षी पावसाची स्थिती बघता मागील वर्षाच्या जुलैचा विक्रम तरी मोडीत निघेल का, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. गेल्या पंधरा वर्षांमध्ये जुलैमध्ये इतके कमी पर्जन्यमान शहरात कधीही नोंदविलेले गेलेले नाही. गेल्या वर्षापासून पावसाचे प्रमाण घसरल्याचे यावरून दिसून येते. पावसाने सलग दुसऱ्या वर्षी हुलकावणी दिली आहे.
---इन्फो---
जिल्ह्यात आतापर्यंत ३०८ मिमी
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत इगतपुरी, त्र्यंबकेश्वर वगळता, अन्य तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यवृष्टी झालेली दिसून येत नाही. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३०८ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जुलैच्या बारा दिवसांमध्ये १०.६७ मिमी इतका पाऊस जिल्ह्यात पडला. यावरून शहरासह जिल्ह्यातही पावसाने जुलैमध्ये समाधानकारक हजेरी लावली नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.