नाशकात अवघे १२५३ पाळीव श्वान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:44 AM2018-04-29T00:44:18+5:302018-04-29T00:44:18+5:30
शहरात दरवर्षी होणाऱ्या ‘डॉग शो’च्या माध्यमातून मोठ्या संख्येने पाळीव श्वान दिसून येत असतात. धनाढ्यांसह मध्यमवर्गीयांकडे पाळलेले श्वान आढळून येते. मात्र, शहरात केवळ १२५३ पाळीव श्वानांसाठीच महापालिकेकडून अधिकृतरीत्या परवाने वितरित करण्यात आले आहेत.
नाशिक : शहरात दरवर्षी होणाऱ्या ‘डॉग शो’च्या माध्यमातून मोठ्या संख्येने पाळीव श्वान दिसून येत असतात. धनाढ्यांसह मध्यमवर्गीयांकडे पाळलेले श्वान आढळून येते. मात्र, शहरात केवळ १२५३ पाळीव श्वानांसाठीच महापालिकेकडून अधिकृतरीत्या परवाने वितरित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेत खास पशुसंवर्धन विभाग कार्यान्वित केला असला तरी, आजारी पाळीव श्वानांवर उपचार करणारी कोणतीही यंत्रणा महापालिकेकडे उपलब्ध नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील ओसवाल यांनी पशुसंवर्धन व आरोग्य विभागाला विचारलेल्या माहितीतून हे वास्तव समोर आले आहे. महापालिकेमार्फत शहरात भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण केले जाते. त्यावर लाखो रुपये खर्ची घातले जातात. मात्र, आजारी व पिसाळलेल्या श्वानांवर उपचार करणारी यंत्रणा पालिकेकडे उपलब्ध नाही. महापालिकेने आजवर किती श्वानांची तपासणी केली याबाबतही माहिती उपलब्ध नाही. पाळीव श्वानांचा अधिकृत असा सर्व्हेच झालेला नाही.
श्वान नोंदणीबाबत उदासीनता
पाळीव श्वानांसाठी महापालिकेचा परवाना अनिवार्य आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने स्टिकर्स तयार करून जनावरांच्या दवाखान्यात प्रबोधन करण्याचे म्हटले असले तरी स्टिकरसंदर्भात अधिक माहिती देण्यात आलेली नाही. पाळीव कुत्र्यांच्या परवान्यासाठी मनपाने ५० रु पये श्वान कर, २५ रु पये अनुज्ञापत्र, २५ रु पये बॅच असे नवीन नोंदणीकरिता १०० रु पये आणि नूतनीकरणाकरिता ५० रु पये निश्चित केल्याचे म्हटले आहे. मात्र नोंदणीबाबत श्वानमालकांमध्ये उदासीनता दिसून येते.