मिलिंदनगरात १२०० रहिवाशांसाठी फक्त २० शौचालये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:37 AM2019-06-08T00:37:20+5:302019-06-08T00:37:36+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून तिडके कॉलनी येथील मिलिंंदनगर भागात बाराशेहून अधिक रहिवासी राहात असून, याठिकाणी असलेल्या शौचालयांची दुरवस्था झालेली आहे. शौचालयांचे दरवाजे तुटलेले असून, अस्वच्छता, दुर्गंधी पसरलेली आहे.
सिडको : गेल्या अनेक वर्षांपासून तिडके कॉलनी येथील मिलिंंदनगर भागात बाराशेहून अधिक रहिवासी राहात असून, याठिकाणी असलेल्या शौचालयांची दुरवस्था झालेली आहे. शौचालयांचे दरवाजे तुटलेले असून, अस्वच्छता, दुर्गंधी पसरलेली आहे. या समस्यांबरोबरच याच भागातून जाणाऱ्या नंदिनी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात घाण व कचरा नागरिकांकडून टाकला जात आहे. अस्वच्छता, दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, याबाबत महापालिकेने लक्ष देत सुविधा पुरविण्याची अपेक्षा मिलिंदनगरवासीयांनी केली आहे.
तिडके कॉलनी परिसरातील मिलिंदनगर भागात गेल्या अनेक वर्षांपासून रहिवासी रहात असून, या रहिवाशांना मनपाच्या माध्यमातून सुविधा दिल्या जात नसल्याने मनपाच्या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या ठिकाणी अंतर्गत रस्त्यांची अवस्था खराब झाली असून, साफसफाई करण्यासाठी मनपाचे कर्मचारी कधीतरी येतात. या भागातील बहुतांशी पथदीप बंद असून, चालू असलेले पथदीप हे रात्री उशिराने सुरू होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मिलिंदनगर भागात बाराशेहून अधिक रहिवासी असून, त्यांच्यासाठी केवळ २० शौचालये आहेत. यातील बहुतांशी शौचालयांचे दरवाजे तुटलेले असून, याठिकाणीदेखील लाइटची व्यवस्था नाही. तसेच शौचालयाची दैनंदिन साफसफाई होणे गरजेचे असताना महिनाभरानंतर वरवर स्वच्छता केली जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. सांडपाणी जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने रस्त्यावर खराब पाणी साचत असून, यामुळे डासांचे प्रमाण वाढलेले असल्याचे पप्पू चाचकर, शंकर बागुल यांनी सांगितले. या भागात घंटागाडी नियमित येत नसल्याने नागरिकांना नाइलाजास्तव कचरा हा नंदिनी नदीत टाकावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. महापालिकेने मूलभूत सुविधा देण्याबरोबरच लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान तसेच जिमची व्यवस्था करण्याची गरज असल्याचे सदाशिव लहामगे, सागर वाघमारे यांनी सांगितले. नंदिनी नाल्यालगत घर असलेल्या नागरिकांना नाल्यातील दुर्गंधीमुळे त्रास सहन करावा लागत असून, या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा तसेच घाण टाकण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे विमल वाडगावकर, राजेंद्र साबळे यांनी सांगितले. मिलिंदनगर भागात लोकसंख्येच्या प्रमाणात शौचालये कमी असून, यासाठी मनपाने याठिकाणी शौचालयांची संख्या वाढविण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.