जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा २४ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:20 AM2021-06-16T04:20:24+5:302021-06-16T04:20:24+5:30

नाशिक : मागील आठवड्यात बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले असताना दुसरीकडे धरणांमधील जलसाठ्याने तळ गाठला आहे. ...

Only 24% water storage in dams in the district | जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा २४ टक्के जलसाठा

जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा २४ टक्के जलसाठा

Next

नाशिक : मागील आठवड्यात बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले असताना दुसरीकडे धरणांमधील जलसाठ्याने तळ गाठला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील लहान-मोठ्या जलप्रकल्पांमध्ये अवघा २४ टक्के जलसाठा शिल्लक अजून पावसाची प्रतीक्षा लांबली, तर पाण्याची पातळी आणखी कमी होणार आहे.

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस बरसल्याने जिल्ह्यातील धरणे तृप्त झाली होती. सरासरीपेक्षा अधिक झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या-नाल्यांना पूर आला, तर धरणांतील पाणी पातळीतही मोठी वाढ झाल्याने जिल्ह्याला पाण्याची कमतरता जाणवली नाही. गेल्यावर्षी दमदार पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यांमधील धरणांमधून विक्रमी पाण्याचा विसर्ग देखील करण्यात आला. धरणे काठोकाठ भरल्यामुळे जूनअखेरपर्यंतही जिल्ह्याला पाण्याची टंचाई जाणवणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता जूनच्या मध्यावरच जलसाठा अवघा २४ टक्क्यावर आल्याने नागरिकांना पाण्याची काटकसर करावी लागण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील धरणसमूहांमध्ये २४ टक्के जलसाठा असून मागीलवर्षी जूनच्या पंधरवड्यात ३० टक्के इतका जलसाठा शिल्लक होता. यंदा कडाक्याच्या उन्हामुळे धरणसाठा अपेक्षेपेक्षा कमी झाला आहे. पावसाची प्रतीक्षा लांबली तर असलेल्या जलसाठ्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. जूनचे पंधरा दिवस उलटून गेले असून नाशिक जिल्ह्याला अजूनही पावसाची प्रतीक्षा करावी लागू शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे, काही दिवस पावसाच्या परिस्थितीवर धरणांची पातळी अवलंबून असणार आहे. जिल्ह्यातील उपयुक्त जलसाठा कमी होत असल्याने आता सर्वांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

धरणांमधील एकूण पाणी साठवण क्षमतेच्या सरासरी २४ टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. यंदा मान्सून शंभर टक्के बरसणार असल्याचा दावा हवामान खात्याने केला आहे. मात्र जूनमध्ये अजूनही पाऊस बरसला नसल्याने उपयुक्त जलसाठा कमी होत असल्याचे दिसत आहे. सध्या १५६६२ दशलक्ष घनफूट म्हणजेच २४ टक्के जलसाठा शिल्लक आहे, तर मागीलवर्षी १९६८२ द.ल.घ.फू. म्हणजेच ३० टक्के जलसाठा शिल्लक होता.

जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा अधिक धरणांमध्ये १० ते ३० टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे, तर नांदुरमध्यमेश्वरमध्ये १०० टक्के, तर वालदेवी धरणात ६६ टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे.

--इन्फो--

गंगापूर धरणात ४० टक्के

गंगापूर धरणात ४० टक्के जलसाठा आहे, तर समूहाची टक्केवारी २९ टक्के इतकी आहे. त्यामध्ये काश्यपीत १७, गौतमी गोदावरीत १६, तर आळंदी धरणात १० टक्के इतका जलसाठा आहे. पालखेड धरणसमूहात देखील १३ टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे.

Web Title: Only 24% water storage in dams in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.