पेठ तालुक्यात चार टक्केच भात लावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:10 AM2021-07-19T04:10:53+5:302021-07-19T04:10:53+5:30

पेठ : पावसाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेठ तालुक्यात यावर्षी पावसाने वक्रदृष्टी केली असून ,जुलै महिन्याच्या मध्यावर केवळ ...

Only 4% paddy is planted in Peth taluka | पेठ तालुक्यात चार टक्केच भात लावणी

पेठ तालुक्यात चार टक्केच भात लावणी

Next

पेठ : पावसाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेठ तालुक्यात यावर्षी पावसाने वक्रदृष्टी केली असून ,जुलै महिन्याच्या मध्यावर केवळ ४ टक्के भाताची लागवड होऊ शकली असल्याने ऐन पावसाळ्यात पडणाऱ्या कडक उन्हात रोपे वाचविण्याची केविलवाणी धडपड शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

दरवर्षी आषाढी एकादशीला भात व नागलीची लावणी पूर्ण करून शेतकरी पंढरपूरच्या वारीकडे प्रस्थान होत असल्याची परंपरा होती. कोरोनामुळे दोन वर्षापासून वारी बंद असली तरी इकडे वरुणराजाने वक्रदृष्टी केल्याने आषाढी एकादशीलासुध्दा भात लावणी करता आली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरवर्षी जुलै महिन्यात संततधार पाऊस धुमाकूळ घालतो, सध्या मात्र कडक ऊन पडत असल्याने लावणी तर सोडाच, पेरणी केलेली रोपे वाचविण्यासाठी बादलीने पाणी घालावे लागत आहे.

पेठ तालुक्याचे सन २०२१-२२ चे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २७ हजार ४४९ हेक्टर असून, त्यामध्ये भात, नागली, वरई, तूर, मूग, उडीद, कुळीद, भुईमूग आदी खरीप पिकांचा समावेश आहे. यामध्ये भात, नागली व वरई या तीन पिकांची पुनर्लावणी खोळंबली असून इतर पिकांची पेरणीही रखडली आहे. काही प्रमाणात पाण्याची सुविधा असलेले शेतकरी वीजपंप, ऑईल मशीनचा वापर करून लावणी करण्यासाठी कसरत करताना दिसून येत आहेत.

कृषी विभागाचे बांधावर समुपदेशन तालुका कृषी विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या खरीप पीक आराखड्यानुसार जूलैअखेर १०० टक्के लावणी अपेक्षित असताना केवळ ४ टक्के पेरणी होऊ शकल्याने तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, मंडल कृषी अधिकारी मुकुंद महाजन, श्रीरंग वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कर्मचारी व अधिकारी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करत आहेत. हवामानाचा अंदाज व पावसाची पूर्ण खात्री असल्याशिवाय कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी लावणीची घाई करू नये, असे आवाहनही कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

इन्फो

खरीप पीक पेरणी आराखडा

सरासरी क्षेत्र : २७,४४९.४० हेक्टर

रोपवाटिका क्षेत्र -२०३७.०५ हेक्टर

प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र - १०६१.७५ हेक्टर

टक्केवारी - ३.८७ टक्के

फोटो - १८ पेठ राइस

पावसाने दडी मारल्याने ऑईल मशीनच्या पाण्यावर चारसूत्री पध्दतीने भाताची लावणी करताना पेठ तालुक्यातील शेतकरी.

180721\18nsk_4_18072021_13.jpg

फोटो - १८ पेठ राइस पावसाने दडी मारल्याने ऑईल मशीनच्या पाण्यावर चारसुत्री पध्दतीने भाताची लावणी करतांना पेठ तालुक्यातील शेतकरी. 

Web Title: Only 4% paddy is planted in Peth taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.