निवृत्तिनाथांच्या पालखीसोबत ४० वारकऱ्यांनाच परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 11:46 PM2021-07-14T23:46:51+5:302021-07-15T01:03:46+5:30
त्र्यंबकेश्वर : येत्या सोमवारी (दि. १९) आषाढ शु. दशमीला येथील संत निवृत्तिनाथ महाराज यांची पालखी पहाटे पाच वाजता शिवशाही बसने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती निवृत्तिनाथ देवस्थान प्रशासकीय समितीचे सदस्य ॲड. भाऊसाहेब गंभिरे यांनी दिली. यावेळी परिवहन महामंडळाच्या दोन शिवशाही बस पालखीच्या दिमतीला असणार आहेत. या दोन्ही बस मिळून ४० भाविकांना परवानगी देण्यात आली आहे.

दरवर्षी संत निवृत्तिनाथ पायी दिंडी सोहळ्यात जवळपास २५ दिंड्या सहभागी होतात. त्यामुळे यावेळी त्या प्रत्येक दिंडीचा प्रतिनिधी म्हणून एक असे २५ वारकरी सहभागी होतील. तर दोन दिंडी मानकरी ह.भ.प.बाळकृष्ण महाराज डावरे, ह.भ.प.मोहन महाराज बेलापूरकर, देवस्थानचे पुजारी, किमान चार प्रशासकीय सदस्य, विणेकरी, झेंडेकरी, टाळकरी, पखवाज वादक, संस्थानचे दोन कर्मचारी आदी देवाच्या लवाजम्यासह या शिवशाहीत असणार आहेत. दरम्यान या वेळी माजी विश्वस्तांना पालखी सोहळ्यात प्रवेश देऊ नये असे आवाहन एका संघटनेने केले आहे. तसे दिल्यास तर बस समोर आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. मागील वर्षी त्र्यंबकेश्वरमंदिरासमोरून सकाळी १० वाजता बसमधून पालखीचे प्रस्थान करण्यात आले होते. यावर्षी दोन्ही बस पहाटे पाच वाजताच त्र्यंबकेश्वर येथून रवाना होणार आहेत. याबाबत पुजारी जयंत महाराज गोसावी यांनी सांगितले, बस दुपारी ३ वाजता पोहोचेल अशा बेताने निघावे लागणार आहे. वाखरीपर्यंतच बस थांबणार आहे. तेथून पायी दिंडीने पंढरपुरात पोहचायचे आहे. त्यामुळे पहाटे पाच वाजताच निघावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.