पहिल्या दिवशी केवळ ५७ टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:13 AM2021-01-17T04:13:45+5:302021-01-17T04:13:45+5:30
नाशिक : जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे १३ केंद्रांवर १३०० कोरोना योद्धयांच्या लसीकरणाचे लक्ष्य निर्धारित केलेले असताना प्रत्यक्षात ...
नाशिक : जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे १३ केंद्रांवर १३०० कोरोना योद्धयांच्या लसीकरणाचे लक्ष्य निर्धारित केलेले असताना प्रत्यक्षात केवळ ७४५ कर्मचाऱ्यांनाच लसीकरण करण्यात आले आहे. लस न घेतलेल्या ५५५ कर्मचाऱ्यांपैकी काही अनुपस्थित राहिले, काहींनी प्रकृतीचे कारण दिले, तर काहींनी पुढील टप्प्यात लस घेणार असल्याचे सांगून पहिल्या दिवशी लस घेण्यास नकार दिला. त्यामुळे लसीकरणाच्या पहिल्या दिवशी केवळ ५७ टक्के लसीकरणाचे लक्ष्य साध्य होऊ शकले.
नाशिक शहरातील ४ केंद्र, मालेगाव शहर परिसरातील पाच, तसेच कळवण, चांदवड, निफाड आणि येवला उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी पहिल्या दिवसाच्या लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळपासून प्रत्येक केंद्रावर निर्धारित प्रोटोकॉलनुसार सर्व सज्जता ठेवण्यात आली होती. औपचारिक शुभारंभ झाल्यानंतर क्रमनिहाय आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करून त्यांचे लसीकरण करण्यात आले. प्रत्येक कर्मचाऱ्याला लसीकरणानंतर अर्धा तास निगराणी कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात आले. त्यानंतरच संबंधितांना त्यांच्या कामाच्या जागी पाठविण्यात आले.
इन्फो
लसीकरणाला नकाराची कारणे
जिल्ह्यातील लसीकरणामध्ये प्रत्येक केंद्रावर काही कर्मचाऱ्यांनी नकार दिला. त्यात सर्व केंद्रांमध्ये मिळून ४३ जणांनी इतर आजाराचे कारण दिले. १२ कर्मचाऱ्यांनी ॲलर्जीचे कारण सांगून नकार दिला, तर अन्य कर्मचाऱ्यांमध्ये १५ गरोदर माता, तर २५ स्तनदा मातांचा समावेश होता. त्यामुळे एकूण ९३ जणांनी याप्रकारे नकार दिला, तर ४६२ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुढील टप्प्यात लसीकरण करून घेणार असल्याचे सांगून पहिल्या दिवशी लसीकरण घेण्यास नकार दिल्याने एकूण ५५५ कर्मचाऱ्यांचे लसीकरण होऊ शकलेले नाही.
इन्फो
पुढील टप्प्यात १०० टक्क्यांसाठी प्रयत्न
काही ठिकाणी लसीकरण थोडे कमी झाले आहे. मात्र, राज्य पातळीवरदेखील लसीकरणात नाशिकचा क्रमांक २६ वा आहे. संबंधित कर्मचारी का आले नाहीत, त्याची माहिती घेतली जाणार आहे. नागरी भागात लसीकरण कमी झाल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. मात्र, त्याची कारणे शोधून पुढील टप्प्यात १०० टक्के लसीकरणासाठी प्रयास केले जाणार आहेत.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी