४५ वर्षांवरील नागरिकांचे अवघे ९ टक्के लसीकरण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:16 AM2021-05-25T04:16:40+5:302021-05-25T04:16:40+5:30
नाशिक : जिल्ह्यातील लसीकरणाची प्रक्रिया अत्यंत मंदावली असून, गत ४ महिन्यांमध्ये ४५ वर्षांवरील वयोगटातील अवघ्या २ लाख २ हजार ...
नाशिक : जिल्ह्यातील लसीकरणाची प्रक्रिया अत्यंत मंदावली असून, गत ४ महिन्यांमध्ये ४५ वर्षांवरील वयोगटातील अवघ्या २ लाख २ हजार ९९७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असल्याने जिल्ह्यात अवघे ३ टक्क्यांपेक्षाही कमी नागरिकांचे लसीकरण झाल्याचे दिसून येत आहे.
शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या ७२ लाख आहे. त्यातील ४५ वर्षांपुढील लोकसंख्या ही २१ लाख ८६ हजार ६९७ आहे.
त्यापैकी केवळ २ लाख २ हजार ९९७ नागरिकांनाच आतापर्यंत दुसरा डोस देऊन लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात ४५ वर्षांवरील ६५ हजार ४६३, तर ६० वर्षांवरील ७६ हजार ९५२ आणि ४५ वर्षांवरील आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी ६० हजार ५८२ नागरिकांनी लस घेतली आहे. हे तिन्ही प्रकार मिळून एकूण संख्या अवघी २ लाख, २ हजार ९९७ इतकी आहे. ४५ वर्षांवरील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा केवळ ९.२८ टक्के आहे. म्हणजेच आतापर्यंत केवळ १० टक्क्यांपेक्षा कमी नागरिकांचेच दोन्ही डोसचे पूर्ण लसीकरण झाले आहे.
इन्फो
जिल्ह्यातील एकूण लसीकरण
नाशिकच्या ७२ लाख ८८ हजार ९९० या एकूण लोकसंख्येपैकी १८ वर्षांवरील पात्र नागरिकांपैकी ८ लाख ८६ हजार ८८१ एवढ्याच लोकसंख्येने लस घेतली आहे. त्यातही पहिला डोस घेतलेल्यांची संख्याच ६ लाख ८३ हजार ७६१ इतकी आहे. म्हणजे या लोकसंख्येने अद्याप दुसरा डोस घेतलेला नसल्याने त्यांचे पूर्ण लसीकरण होण्यासदेखील अद्याप काही कालावधी लागणार आहे.
इन्फो
४५ वर्षांखालील केवळ अर्धा टक्का
जिल्ह्यातील पात्र १८ ते ४५ वर्षांखालील वयोगटातील एकूण सुमारे २५ लाख लोकसंख्येपैकी अवघ्या १४ हजार ४३६ नागरिकांनाच आतापर्यंत लस मिळाली आहे. त्यातही १४ हजार ३१३ नागरिकांना पहिली लस, तर अवघ्या १२३ नागरिकांना दुसरी लस प्राप्त झाली आहे. म्हणजेच १८ ते ४५ वयोगटातील पहिला डोस घेतलेल्यांची संख्या एक टक्काही नव्हे, तर केवळ अर्धा टक्के. त्यातही दुसरा डोस घेतलेल्यांची १२३ संख्या, तर टक्केवारीत नगण्यच आहे. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेत सध्या सर्वाधिक चिंता याच वयोगटाला आहे.
इन्फो
एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ३ टक्क्यांपेक्षा कमी
जिल्ह्यातील एकूण ७२ लोकसंख्येला दोन्ही डोस दिल्यासच जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकणार आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व वयोगटातील ७२ लाख नागरिकांच्या तुलनेत दोन डोस घेतलेल्या नागरिकांची २ लाख ३ हजार १२० इतक्याच लोकसंख्येचे लसीकरण झाले म्हणजे, तर ३ टक्क्यांपेक्षाही कमी म्हणजे अवघे २.७८ टक्के इतके अत्यल्प आहे.