जिल्हा बँकेच्या एकमेव प्रशासकाचाही राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 01:41 AM2021-12-15T01:41:44+5:302021-12-15T01:42:05+5:30
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळातील एकमेव प्रशासक असलेले आरिफ खान यांनीही आपल्या प्रशासकीय मंडळाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला असून, संचालक, प्रशासक नसल्याने जिल्हा बँक वाऱ्यावर सुटल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.
नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळातील एकमेव प्रशासक असलेले आरिफ खान यांनीही आपल्या प्रशासकीय मंडळाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला असून, संचालक, प्रशासक नसल्याने जिल्हा बँक वाऱ्यावर सुटल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाचा अनागोंदी कारभार, कोट्यवधीचा खर्च व थकीत कर्ज या साऱ्या कारणांमुळे सहकार विभागाकडून बँकेची चौकशी सुरू होती. बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक नुकसानीला आजी-माजी संचालकांना जबाबदार धरून संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. तथापि, सहकार विभागाच्या या आदेशाविरुद्ध संचालकांलनी उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविली होती. त्यानंतर संचालकांनी कामकाज पुन्हा सुरू केले. दरम्यान, उच्च न्यायालयाने बँकेच्या संचालक मंडळ बरखास्तीवरील स्थगिती उठविल्याने संचालकांना घरी पाठविण्यात आले व त्यानंतर २३ मार्च २०२१ रोजी सहकार विभागाने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेवर तीनसदस्यीय प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली होती. त्यात सेवानिवृत्त निबंधक आरिफ खान, सहकार अधिकारी चंद्रकांत बारी व सनदी लेखापाल तुषार पगार यांचा समावेश होता. तथापि, बँकेच्या एकूणच कारभाराची बजबजपुरी पाहता, तुषार पगार यांनी दुसऱ्याच दिवशी प्रशासकीय मंडळात कामकाज करण्यास असमर्थता व्यक्त केली, तर चंद्रकांत बारी व आरिफ खान यांनी काही महिने बँकेच्या कामकाजात लक्ष घातले. मात्र बँकेच्या थकीत कर्ज वसुली प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे पाहून बारी यांनी स्वत:ला प्रशासकीय मंडळापासून वेगळे करून घेतले होते. त्यामुळे एकमेव आरिफ खान यांच्यावरच बँकेची धुरा होती. त्यांनीही मंगळवारी (दि. १४) व्यक्तिगत कारणास्तव प्रशासकीय मंडळाचा राजीनामा देत असल्याचे पत्र सहकार आयुक्तांना पाठविले आहे.
चौकट========
राजकारण्यांकडून छळ?
दरम्यान, जिल्हा बँकेने नाशिक सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास द्यावा यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव प्रशासकांवर टाकण्यात येत होता. त्यातून शेतकरी, सरपंच अशांना पुढे करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला, तर दुसरीकडे बँकेला उर्जितावस्था आणण्यासाठी थकबाकीदारांविरुद्ध मालमत्ता जप्तीची मोहीम हाती घेतली असता, त्यातूनही राजकीय व्यक्ती व माजी संचालकांचा हस्तक्षेप वाढला होता. या साऱ्या गोष्टीला कंटाळूनच आरिफ खान यांनी प्रशासकीय मंडळाचा राजीनामा दिल्याची चर्चा बँकेत केली जात आहे.