विषय समित्यांचे वाटप निकालानंतरच
By admin | Published: October 18, 2014 12:18 AM2014-10-18T00:18:27+5:302014-10-18T00:18:27+5:30
जिल्हा परिषद : खातेवाटपाबाबत रहस्य कायम
नाशिक : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व अर्थ समितीसह महत्त्वाच्या असलेल्या शिक्षण व आरोग्य आणि पशुसंवर्धन व कृषी समिती यांचे वाटप हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच होण्याची दाट शक्यता असून, या खातेवाटपात राष्ट्रवादीतच चुरस वाढल्याचे चित्र आहे.
महिला व बालकल्याण समिती सभापतिपद हे शिवसेनेच्या शोभा सुरेश डोखळे यांना मिळाले असून, समाजकल्याण समिती सभापतिपद हे अपेक्षेनुसार राष्ट्रवादीच्या उषा बच्छाव यांना मिळाले आहे. आता उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्यासह विषय समिती सभापती केदा अहेर व किरण थोरे यांना नेमके कोणते खाते मिळणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या गोटातील चर्चेनुसार बांधकाम व अर्थ समिती ही अपक्ष किरण पंढरीनाथ थोरे यांना, तर शिक्षण व आरोग्य समिती भाजपाचे केदा अहेर यांना, तसेच उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांना मागील उपाध्यक्षांप्रमाणेच कृषी व पशुसंवर्धन समिती मिळेल, असे बोलले जात आहे. मात्र निकालात राष्ट्रवादीच्या बाजूने अपेक्षित निकाल लागले नाही तर मात्र वेळेवर समित्यांचे वाटप करताना बदल होऊ शकतो. एका गटनेत्याने तर समिती वाटपाबाबत सभेत मतदानच होईल, असे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच भाजपाला जिल्ह्णात चांगला प्रतिसाद मिळाला आणि सरकार स्थापनेसाठी भाजपा प्रबळ दावेदार असला, तर त्याचे पडसादही जिल्हा परिषदेपर्यंत उमटण्याची शक्यता असून, तसे झाले तर महत्त्वाचे बांधकाम व अर्थ खाते मिळविण्यासाठी केदा अहेर फिल्डिंग लावू शकतात. अद्यापपर्यंत मात्र कोणाला कोणते खाते मिळणार याबाबत रहस्य कायम असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)