नाशिक कृषिउत्पन्न बाजार व शरदचंद्र पवार बाजार समित्यांमध्ये केवळ लिलावाला परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 02:09 PM2020-03-31T14:09:02+5:302020-03-31T15:03:54+5:30
दोन्ही मार्केटच्या समोर रोडवर कोणीही किरकोळ विक्री करणार नाही किंवा भाजीपाल्याचे भरलेले अथवा रिकामी वाहने उभे करणार नाहीत, केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
नाशिक : शहरातील पंचवटी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समिती व शरदचंद्र पवार फळ बाजार समितीत आता केवळ भाजीपाल्याचा लिलाव होणार असून किरकोळ विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. घाऊक व्यपरासाठी शेतकऱ्यांना लिलावकरिता परवानगी दिली जाणार असल्याचे बाजार समित्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्व शेतकरी, व्यापारी ते आडते, हमाल यांना कृषि उत्पन्न बाजार समिती पंचवटी व शरदचंद्र फळ बाजार नाशिक यांचेकडून सुचित करण्यात येत आहे की, दिनांक दोन्ही मार्केटमध्ये फक्त लिलावा करिताच भाजीपाला व फळे शेतकरी घेऊन येतील. त्याठिकाणी शेतकरी कोणत्याही प्रकारे किरकोळ विक्री करणार नाहीत. जर अशी कृती केली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना किरकोळ विक्री करावयाची असल्यास, त्यांनी आपली फळे व भाजीपाला नाशिक महानगरपालिकेने नाशिक शहरात 43 ठिकाणी निश्चित केलेल्या बाजारात विक्री करावयाची आहे.
दोन्ही मार्केटच्या समोर रोडवर कोणीही किरकोळ विक्री करणार नाही किंवा भाजीपाल्याचे भरलेले अथवा रिकामी वाहने उभे करणार नाहीत, केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दोन्ही मार्केटमध्ये कोणतीही दुचाकी प्रवेश करणार नाही फक्त शेतकऱ्यांचे भाजीपाला घेऊन येणारे वाहने व किरकोळ विक्रेते यांचे ऑटोरिक्षा, छोटा हत्ती याच वाहनांना प्रवेश मिळणार आहे .कोणीही मार्केटच्या समोर दुचाकी पार्क करणार नाही केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
याबाबतचे सर्व शेतकरी, किरकोळ विक्रेते व व्यापारी, आडते यांनी नोंद घ्यावी. आपल्या संपर्कातील सर्व संबंधितांना सोशल मिडीयाद्वारे ,व्हाट्सअप ग्रुपद्वारे अवगत करण्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समिती करून आवाहन करण्यात आले आहे.