केंद्र व राज्य सरकारकडून केवळ मनस्ताप : अजित पवार
By admin | Published: February 1, 2017 11:04 PM2017-02-01T23:04:51+5:302017-02-01T23:05:04+5:30
केंद्र व राज्य सरकारकडून केवळ मनस्ताप : अजित पवार
त्र्यंबकेश्वर : अडीच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना केवळ मनस्तापच दिला आहे. शेतकऱ्यांना तर देशोधडीला लावले. त्यांच्या मालाला भाव नाही. त्यामुळे भाजपा काळात शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्त्या झाल्या, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्ता व शेतकरी मेळाव्याप्रसंगी केले.
काळा पैसा हुडकण्याच्या नावाखाली आम्हीही त्यांना पाठिंबा दिला. पण यात गरिबांंचेच नुकसान झाले. नोटाबंदी केली; पण परिणाम विपरीत झाला. आपलेच पैसे आपल्यालाच मिळेनात, विकासदराच्या मुद्द्यावर बोलताना सरकार म्हणते आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली; पण मला तर कुठे दिसत नाही अशी खिल्ली त्यांनी उडविली. नाशिकमध्ये परदेशी कंपन्यांनी कुठे गुंतवणूक केली आहे काय? शिवसेना भाजपाची युती जागावाटपावरून नाही, मतभेद झाले म्हणून नाही तर मुंबई महापालिकेचे बजेट भाजपालाच पाहिजे. आमच्याच ताब्यात असले पाहिजे म्हणून युती तुटली असल्याचा दावाही त्यांनी केला. प्रास्ताविक परवेज कोकणी यांनी केले. यावेळी बाळासाहेब वाघ, जि.प. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांचीही भाषणे झाली.
व्यासपीठावर अॅड. रवींद्र पगार, श्रीराम शेटे, आमदार दीपिका चव्हाण व नरहरी झिरवाळ, विष्णुपंत म्हैसधुणे, अर्जुन टिळे, शोभा मगर, आमदार जयंत जाधव, नितीन पवार, डॉ. भारती पवार, उत्तमबाबा भालेराव, नानासाहेब महाले, दिलीप बनकर, तुकाराम दिघोळे, सचिन पिंगळे, रवींद्र सपकाळ, दीपक वाघ आदिंसह त्र्यंबकेवरचे तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, कार्याध्यक्ष अरुण मेढे पाटील, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शहराध्यक्ष मनोज काण्णव आदि उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठनेते भिवा राजू महाले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यात यांचा समावेश आहे. (वार्ताहर)