बिघडलेल्या आरोग्याची जबाबदारी आयुक्तांचीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 01:28 AM2018-10-20T01:28:42+5:302018-10-20T01:29:17+5:30
शहरात गेल्या ७२ तासांत स्वाइन फ्लूने तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून, वेगवेगळ्या साथरोगांनी आतापर्यंत ७३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेची आरोग्य व्यवस्था कोलमडल्याने शहराचे आरोग्य धोक्यात आले असून, शहरातील कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेला आयुक्तांनाच जबाबदार धरीत नगरसेवकांनी आयुक्त मुंढे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नाशिक : शहरात गेल्या ७२ तासांत स्वाइन फ्लूने तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून, वेगवेगळ्या साथरोगांनी आतापर्यंत ७३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेची आरोग्य व्यवस्था कोलमडल्याने शहराचे आरोग्य धोक्यात आले असून, शहरातील कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेला आयुक्तांनाच जबाबदार धरीत नगरसेवकांनी आयुक्त मुंढे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महासभेत शुक्रवारी (दि.१९) विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी आरोग्यच्या प्रश्नावर लक्षवेधी मांडताना शहरातील आरोग्याच्या प्रश्नावर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत मनपाच्या रुग्णालयांमध्ये अस्वच्छता असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर लक्ष वेधले. घंटागाडीच्या ठेकेदारांना मनपाने पाच कोटी रुपयांचा दंड केला असून, त्यातून घंटागाडीचे काम सुरळीत सुरू नसल्याचे प्रशासन जाहीरपणे मान्य करीत असल्याचे गुरुमित बग्गा म्हणाले, तर भाजपाच्या नगरसेवक अलका अहिरे यांनी सभागृहात दूषित पाण्याची बाटली दाखवून सत्ताधारी भाजपाला घरचा अहेर दिला. तर घंटागाड्यांचे ठेकेदार नियमित काम करीत नाहीत, असा आरोप करीत अस्वच्छतेकडे लक्ष वेधले.
महाआंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाविरोधात लढा...
शहरातील बिटको, जाकीर हुसेन रुग्णालय, स्वामी समर्थ रुग्णालय, सातपूर, मायको रुग्णालयात रुग्णसेवेत अतिशय निष्काळजीपणा होत असून, निवासी वैद्यकीय अधिकाºयांचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देतानाच आरोग्याच्या प्रश्नावर प्रशासनाने सतर्क भूमिका घेतली नाही, तर महाआंदोलनाच्या माध्यमातून लढा देण्याचा इशाराही शिवसेनेतर्फे सभागृहात देण्यात आला.
प्रियंका माने यांचा सभात्याग
भाजपाच्या नगरसेवक प्रियंका माने यांच्या कुटुंबातील व्यक्तींचाच साथ आजाराने मृत्यू झाला, त्यांच्यावर उपचार करण्यात महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉ. जयराम कोठारी व डॉ. इंदुलकर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर सभागृहाने सुचविलेली कारवाई प्रशासनाने केलेली नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर आयुक्तांनी या प्रकरणात डॉ. इंदूलकरांवर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली असून, डॉ. कोठारी यांची बदली करण्यात आल्याचे सांगितले. परंतु माने यांचे त्यावरही समाधान न झाल्याने त्यांनी अखेर सभात्याग केला.