पिंक रिक्षांचा केवळ गवगवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 01:05 AM2019-11-24T01:05:07+5:302019-11-24T01:05:31+5:30

शहरातील महिलांना स्वयंपूर्णतेकडे नेण्यासह महिला वर्गाला प्रवासात सुरक्षेची हमी देण्याच्या उद्देशाने मुंबई, पुण्यानंतर नाशकात सुरू करण्यात येणाऱ्या पिंक रिक्षांची केवळ चर्चाच रंगली. सहा महिन्यांपासून येणार-येणार अशी चर्चा असलेल्या या रिक्षा रस्त्यावर अद्यापही आलेल्या नाहीत.

 The only downside of Pink Ricks! | पिंक रिक्षांचा केवळ गवगवा !

पिंक रिक्षांचा केवळ गवगवा !

Next

नाशिक : शहरातील महिलांना स्वयंपूर्णतेकडे नेण्यासह महिला वर्गाला प्रवासात सुरक्षेची हमी देण्याच्या उद्देशाने मुंबई, पुण्यानंतर नाशकात सुरू करण्यात येणाऱ्या पिंक रिक्षांची केवळ चर्चाच रंगली. सहा महिन्यांपासून येणार-येणार अशी चर्चा असलेल्या या रिक्षा रस्त्यावर अद्यापही आलेल्या नाहीत.
महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून शहरातील महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण व परवाने देण्यात येणार होते. त्यासाठी महापालिकेच्या बजेटमध्ये तरतूद करून महापालिकेने या योजनेचा प्रारंभ केला. तसेच त्यासाठी गरजू महिलांकडून प्रशिक्षण व परवान्यासाठी आॅगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, नोव्हेंबर महिन्याचा उत्तरार्ध येऊनदेखील अद्याप या पिंक रिक्षांचा प्रवास सुरू झालेला नाही. महिलांसाठी स्वतंत्र अशी वाहतुकीची व्यवस्था व महिलांनीच चालवलेली अशी ही संकल्पना नवी दिल्ली, मुंबई व पुण्यात राबविली जात आहे. महिलांना पिंक रिक्षा चालविण्याकरिता प्रशिक्षण व परवाने उपलब्ध करून देण्यासाठी निधीची तरतूदही महापालिकेच्या महिला बालकल्याण विभागाने केली होती. महिला व बालकल्याण विभागाच्या अखत्यारित महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमांतर्गत पिंक रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचा प्रस्तावदेखील महापालिकेने तयार केला होता. त्यासाठी इच्छुक महिलांकडून अर्ज मागविण्यात आले होते. ज्या महिलांना असे प्रशिक्षण हवे असेल, त्यांनी महापालिकेकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन महिला व बालकल्याण विभागाकडून करण्यात आले होते. प्रशिक्षणासाठी १८ वर्षे वयाची अट असून, नाशिकमध्ये तीन वर्षे रहिवास असल्याचा दाखला देणे, किमान आठवी उत्तीर्ण आणि शाळा सोडल्याचा दाखला एवढी कागदपत्रे बंधनकारक होती. महिलांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज मिळविण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, प्रत्यक्षात काहीच घडलेले नसल्याने पिंक रिक्षा अद्याप तरी केवळ कागदावरच राहिल्या आहेत.
सुरक्षेची अभिनव संकल्पना
शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने तसेच बसेसमध्ये होणारी गर्दी, धक्काबुक्की आणि अन्य प्रकार टाळण्यासाठी महिला व विद्यार्थिनींकडून प्रवासासाठी खासगी रिक्षांचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु, या रिक्षांमधून प्रवास करताना महिलांना सातत्याने त्यांच्या सुरक्षेची काळजी असते. अनेकदा रिक्षामध्ये महिलांची छेडछाड होण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असल्याने त्यांच्यासाठी पिंक रिक्षा या वरदान ठरणार आहेत. त्यामुळेच महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पिंक रिक्षा या नावाची संकल्पना पुढे आणली.

Web Title:  The only downside of Pink Ricks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.