जिल्हा सीमेवर होते केवळ ‘चालकांची’ तपासणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:31 AM2020-12-12T04:31:17+5:302020-12-12T04:31:17+5:30
नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या गुजरात राज्याला जोडणाऱ्या पेठनजीकच्या सीमेवर गुजरातकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत होती. मात्र, मनुष्यबळ कमी ...
नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या गुजरात राज्याला जोडणाऱ्या पेठनजीकच्या सीमेवर गुजरातकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत होती. मात्र, मनुष्यबळ कमी असताना केवळ त्या वाहनांमधील चालकांकडे चौकशी करून त्यांना सोडले जात हाेते. त्या वाहनातील अन्य प्रवाशांचीदेखील केवळ जुजबी माहिती विचारून वाहन पुढे जाऊ देण्याचे प्रकार घडत असल्याचे दिसून आले.
प्रत्येक जिल्हा आणि राज्याच्या टोलनाक्यांवर परराज्यातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यासाठी परिवहन विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागातील प्रत्येकी दोन माणसे प्रत्येकी सहा तासांच्या शिफ्टमध्ये कार्यरत राहण्याचे निर्देशदेखील देण्यात आले आहेत. मात्र, बुधवारी (दि. २) पेठनजीकच्या नाक्यावर केवळ चारच कर्मचारी कार्यरत होते. त्यात एक वाहतूक पोलीस, एक शिक्षक, एक महसूल कर्मचारी आणि एक आरोग्यसेवक इतकेच कर्मचारी होते. सकाळच्या प्रारंभीच्या टप्प्यात हे कर्मचारी गुजरातमधून येणाऱ्या वाहनांमधील केवळ चालकांना खाली उतरवून त्यांच्याकडून माहिती घेत होते. वाहन कुठून आले, कुठे चालले, सर्वांनी मास्क लावले आहेत का, वाहन क्रमांक, चालकाचा भ्रमणध्वनी क्रमांक अशी माहिती विचारून घेतली जात होती. तसेच वाहनात कुणी कोरोना रुग्ण तर नाही ना, अशी विचारणादेखील त्यालाच केली जात होती. त्यामुळे तो चालक साहजिकपणे कुणीही रुग्ण नाही, असेच सांगत असल्याने वाहन पुढे जाऊ दिले जात होते. मात्र, दुपारी अन्य कर्मचाऱ्यांसह वैद्यकीय चाचणी करणारे पथकदेखील दाखल झाल्यानंतर मात्र येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर मग सर्व कर्मचाऱ्यांना वाहनातून उतरवून त्यांचे थर्मल चेकिंग, मास्क तपासणी, कुणाचे टेम्परेचर वाढल्यासारखे दिसल्यास उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून रॅपिड अँटिजन टेस्ट करून घेतली जात होती.
कोट
वाहन आणि सर्व स्टाफ उपलब्ध झाल्यानंतर तत्काळ आम्ही नाक्यावर पोहोचतो. त्यानंतर सर्व संशयितांची तपासणी करून त्यात जर कुणी बाधित आढळले तर त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्याबाबतची तजवीज करतो. चाचण्यांसाठी सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध असल्याने कोणतीही अडचण येत नाही.
गिरीश सूर्यवंशी, आरोग्य अधिकारी
फोटो कॅप्शन
पेठ टोलनाक्यावर थर्मल टेस्टबाबत हेळसांड
पेठच्या टोलनाक्यावर थर्मल टेस्टबाबत प्रारंभीच्या टप्प्यात काही वाहनचालकांची केली, काहींची केली नाही अशाप्रकारे यंत्रणा कार्यरत होती. केवळ आदेश असल्यामुळे वाहनांच्या नंबर आणि वाहनचालकांच्या क्रमांकाची माहिती घेण्यात येत होती. दिवसाच्या पूर्वार्धात आदेशाची अंमलबजावणी करण्याचा केवळ दिखावा करण्यात येत होता.