अवघ्या काही इंचावरुन साक्षात मृत्यूची झेप...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:56 AM2019-01-26T00:56:10+5:302019-01-26T00:56:29+5:30
जॉगिंग करून आल्यानंतर नेहमीप्रमाणे डॉ. हेमा काळे (६५) शारदानगर-मधील लहान उद्यानात प्राणायाम करण्यासाठी गेल्या. प्राणायामानंतर त्यांनी बाकावर विश्रांती घेतली अन् भ्रमणध्वनीवर मुलीशी संवाद साधला त्याचवेळी त्यांना बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला.
नाशिक : जॉगिंग करून आल्यानंतर नेहमीप्रमाणे डॉ. हेमा काळे (६५) शारदानगर-मधील लहान उद्यानात प्राणायाम करण्यासाठी गेल्या. प्राणायामानंतर त्यांनी बाकावर विश्रांती घेतली अन् भ्रमणध्वनीवर मुलीशी संवाद साधला त्याचवेळी त्यांना बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. त्यामुळे त्या हळूच बाकावरून उतरून काही पावले चालल्यावर मागे वळून पाहिले असता बिबट्याने डरकाळी फोडत त्यांच्या खांद्याजवळून थेट बंगल्यात झेप घेतली. ‘माझ्या खांद्याजवळून अवघ्या पाच इंच अंतर लांबून बिबट्याने झेप घेतली, दैव बलवत्तर होते म्हणून मी बचावले’ असे सांगताना काळे यांच्या चेहऱ्यावर ती भीती दिसून आली.
शारदानगरमधील एक लहान उद्यान हे नागरिकांच्या वापरात नसून या उद्यानात काही प्रमाणात झाडे व शोभीवंत रोपे वाढलेली आहेत. उद्यानाचे दोन्ही प्रवेशद्वार बंद राहतात. या उद्यानात दररोज काळे या एकट्याच प्राणायाम करण्यासाठी जातात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी (दि.२५) प्राणायाम करण्यासाठी उद्यानात गेले. यावेळी उद्यानात संपूर्ण शुकशुकाट होता. सकाळी कोवळ्या उन्हात योग-प्राणायाम झाल्यानंतर काळे अल्पवेळ विश्रांतीकरिता बाकाजवळ जाऊन बसल्या. बाकावर बसल्यानंतर त्यांना काही वेळेतच गुरगुरण्याचा आवाज कानी आला. त्यांना शंका आली, कुत्रा अशाप्रकारे गुरगुरत नाही म्हणून त्यांनी मागे मान फिरविली मात्र त्यांना काहीही दिसले नाही. बाकावरून उतरून त्या काही पावले पुढे चालत जात नाही, तोच बाकाच्या पाठीमागे असलेल्या ‘गोल्डन दुरांटा’ नावाच्या शोभीवंत झाडांच्या पाठीमागून बिबट्याने त्यांच्या अगदी जवळून शेजारच्या बंगल्याच्या दिशेने झेप घेतली.ज्या बाकावर काळे विश्रांतीसाठी बसलेल्या होत्या त्या बाकाला लागून ‘गोल्डन दुरांटा’ची लागवड शोभेसाठी करण्यात आली आहे. या झाडांच्या आडोशालाच बिबट्याने ठिय्या दिला
होता. बिबट्याने जेव्हा डरकाळी फोडली तेव्हा काळे या प्रचंड घाबरल्या. उद्यानात त्या एकट्याच असल्याने आपण बिबट्याच्या तावडीत सापडल्याच्या विचाराने त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला; मात्र सुदैवाने बिबट्याने त्यांच्यावर चाल न करता थेट त्यांना बघून भागवत यांच्या बंगल्याच्या दिशेने उडी घेतली आणि काळे यांचा जीव भांड्यात पडला.
मी आयुष्यात वन्यप्राण्याला असे जवळून बघितलेले नव्हते. बिबट्याने जेव्हा उडी घेतली तेव्हा त्याचे भले मोठे भारदस्त शरीर बघून अवाक् झाले. मात्र त्यानंतर एक क्षणभरदेखील त्या ठिकाणी थांबण्याचे धाडस झाले नाही. तातडीने उद्यानातून काढता पाय घेतला आणि सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांच्या बंगल्यात गेले व त्यांना घडलेला प्रकार सांगितला.
-डॉ. हेमा काळे, माजी वैद्यकीय अधिकारी, मनपा, नाशिक