बलस्थाने कळली तरच उत्कृष्ट नवनिर्मिती
By admin | Published: September 14, 2014 12:53 AM2014-09-14T00:53:06+5:302014-09-14T00:55:27+5:30
बलस्थाने कळली तरच उत्कृष्ट नवनिर्मिती
नाशिक : नाटक हे असे माध्यम आहे की ज्यामधून आपण विचारांचे अनेक पैलू प्रेक्षकांसमोर मांडू शकतो़ नाटक आणि सिनेमा या दोघांमध्येही प्रेक्षकाचा बुद्धयांक लक्षात घेऊन लिखाण केले तरच तुम्ही प्रेक्षकांना सकस देऊ शकतात़ अर्थात ही दोन्ही माध्यमे वेगळी असून त्यांची बलस्थाने लेखक व दिग्दर्शकाला उमगल्यानंतरच उत्कृष्ट नवनिर्मिती होते असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार प्रशांत दळवी यांनी केले़ ज्योती स्टोअर्स व निर्माण ग्रुप यांच्यावतीने आयोजित लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमातंर्गत ‘नाटक ते सिनेमा’ या विषयावर ते बोलत होते़ ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रेक्षक हा नाटक वा चित्रपट पाहून थांबत नाही तर तो व्यक्त करतात़ त्यामुळे लेखकाला हे सर्व भान ठेवूनच लिहावे लागते़ समाजवादी वडील व उदारमतवादी कुटुंब याबरोबरच घरातील चळवळीचे वातावरण यामुळे लेखक झाले़ तसेच नाटकामध्ये अनुभव विश्वातून जन्म घेईल तेच लिहायचे असे ठरविले़ लेखक होण्यासाठी समोरच्याबद्दलचे कुतुहल आवश्यक असते़ नाटक लिहितांना प्रेक्षक हा हुशार आहे असे समजून लिहिले तरच लेखक सवंग लिहू शकतो़ तसेच नाटक वा चित्रपट तयार करताना व्यवसायिकतेऐवजी गुणात्मक यश मिळवायचे या ध्येयाने काम केल्याचे दळवी म्हणाले़ नाट्य चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितले की, नाटक ही शिकण्याची गोष्ट असून त्याची संकल्पना ही अभ्यासक्रमातच समजली़ नाटक बघतांना प्रेक्षकाचे पंचेद्रिय एकत्र होत असून त्याचा आयक्यू, इक्यू एकत्र होतो त्यामुळे ते परमानंट मेमरीत सेव्ह होते़ सिनेमाची कथा लिहितांना ती दिग्दर्शकाच्या भूमिकेतून लिहिणे गरजेचे असते़ सिनेमात दिग्दर्शक व कॅमेरामन यांची पती-पत्नीच्या भूमिका आवश्यक असते़ त्यामुळे नाटक हे सादरीकरणाचे तर सिनेमा फुलवावा लागतो़ टीव्हीवरील मालिकांमुळे प्रेक्षकांची अभिरुची कमी होत असल्याचेही कुलकर्णी म्हणाले़ यावेळी व्यासपीठावर अॅड़ शशिकांत पवार, वनाधिपती विनायकदादा पाटील, सी़ एल़ कुलकर्णी उपस्थित होते़ सूत्रसंचालन वसंत खैरनार यांनी केले़ (प्रतिनिधी)