एक टक्के रुग्णांनाच मिळाला जनआरोग्य योजनेचा लाभ; रुग्णालयांकडून उपचारास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:14 AM2021-05-19T04:14:45+5:302021-05-19T04:14:45+5:30
कोरोना महामारीच्या संकटात सर्वच नागरिकांना आरोग्य विषयक हमी व आर्थिक दिलासा मिळावा म्हणून शासनाने गोरगरिबांसाठी २३ मे २०२० रोजी ...
कोरोना महामारीच्या संकटात सर्वच नागरिकांना आरोग्य विषयक हमी व आर्थिक दिलासा मिळावा म्हणून शासनाने गोरगरिबांसाठी २३ मे २०२० रोजी महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू केली होती. या योजनेंतर्गंत उपचार करणाऱ्या रुग्णालयांना तशी नोंद करावी लागत असून, या योजनेंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णाचे उपचाराचे देयक शासनामार्फत अदा केले जात आहे. शासनाने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने १ एप्रिल २०२० पासून ही योजना अंमलात आली आहे. सदर योजनेत सुमारे ८५ ते ९० टक्के नागरिकांचा समावेश होत असून उर्वरित नागरिकांना त्याचा लाभ व्हावा म्हणून पिवळी, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनाही त्यात समावेश करण्यात आले.
------
लाभ घेण्यात अनेक अडचणींचा डोंगर
* कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना शासनाने दर निश्चिती करून दिली असून, त्या दरातच रुग्णावर रुग्णालयांनी उपचार करावेत असे बंधनकारक आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांनी या योजनेंतर्गंत समाविष्ट होण्यास नकार दिला.
* रुग्णाची अत्यवस्थता लक्षात घेता रुग्णाचे नातेवाईक बऱ्याच वेळा रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी चांगल्यात चांगल्या रुग्णालयात दाखल करण्यावर भर देतात. त्यामुळे मोठ्या रुग्णालयांमध्ये या योजनेचा लाभ दिला जात नाही.
* शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक देयक झाल्यास ते मिळण्याची शाश्वती रुग्णालयांना नसल्याने अनेक रुग्णालयांकडून रुग्णांना या योजनेची माहितीच दिली जात नाही.
------------------
या योजनेशी जोडलेली जिल्ह्यातील रुग्णालये-२९६२८
* एकूण कोरोनाबाधित- ३७०३५६
* एकूण कोरोनामुक्त-३४५२९०
* आत्तापर्यंत झालेले मृत्यू- ४१००
* सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण-१८१०४
* योजनेचा लाभ घेतलेले रुग्ण- ४७३०
----------------
अशी करा नोंदणी
महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गंत कोराना बाधित रुग्णांवर उपचार घेणाऱ्या रुग्णाला रहिवास पुरावा, फोटो ओळखपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या संकेतस्थळावर त्याची नोंदणी करावी लागते.
---------------------
तर करा तक्रार
* महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत नोंदणी केलेल्या रुग्णालयाने रुग्ण नाकारल्यास त्यावर साथरोग प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करता येतो.
* त्यासाठी तक्रार करण्यासाठी रुग्णाकडे पुरेसे कागदपत्र, आवश्यक पुरावे असणे बंधनकारक आहे.
* रुग्णाला उपचार नाकारल्यास जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक किंवा राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे तक्रार करता येऊ शकते.
---------------
* नाशिक जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेशी जोडण्यात आले आहे.
* या योजनेंतर्गत आजवर ७४०७१ रुग्ण वैध ठरविण्यात आले. त्यापैकी फक्त २९६२८ रुग्ण विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
* जिल्ह्यात फक्त ४७३० म्हणजेच एक टक्का रुग्णांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे.