लस अवघी शंभर, रांगेत पाचशे लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:11 AM2021-07-18T04:11:20+5:302021-07-18T04:11:20+5:30

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची चर्चा होऊ लागली आहे. त्यात केंद्रीय आरोग्य विभागाने दोन्ही डोस घेतलेल्यांना तिसऱ्या ...

Only one hundred vaccine beneficiaries, five hundred beneficiaries in a row | लस अवघी शंभर, रांगेत पाचशे लाभार्थी

लस अवघी शंभर, रांगेत पाचशे लाभार्थी

Next

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची चर्चा होऊ लागली आहे. त्यात केंद्रीय आरोग्य विभागाने दोन्ही डोस घेतलेल्यांना तिसऱ्या लाटेचा धोका कमी असल्याचे म्हटल्याने लोक आता लसीकरणाबाबत अधिक जागृत झाले आहेत. आता १८ वर्षे वयोगटापुढील लाभार्थींनाही लस दिली जात असल्याने तरुणांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे ज्येष्ठांची परवड होताना दिसून येत आहे. दिंडोरी शहरात शनिवारी (दि. १७) लसीकरणासाठी प्रचंड झुंबड उडाल्याचे दिसून आले. लस कमी आणि रांगा जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांचे नियोजन चुकले असल्याचे चित्र असून, लस लोकसंख्येच्या प्रमाणात देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दिंडोरी शहराची लोकसंख्या ३० हजारांच्या आसपास असून, दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात केवळ १०० ते १५० च्या आसपास लस उपलब्ध होत आहे. त्यात गेल्या पंधरवड्यात अनेक वेळा लस उपलब्ध झाली नाही. दिंडोरी शहर तालुक्याचे ठिकाण असल्याने गर्दी मोठ्या प्रमाणात होते. मात्र, लस कमी असल्याने वाद-विवादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. तालुक्यातील खेडेगावात लोकसंख्या कमी असतानाही २०० लसींचा पुरवठा केला जात आहे. शहरी भागात मात्र त्या तुलनेत कमी पुरवठा केला जात आहे. पहाटे पाच वाजेपासून रांगा लागत असून ५०० च्यावर लोक रांगेत उभे राहत आहेत. त्यामुळे फिजिकल डिन्स्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी लस घेण्याच्या प्रयत्नात प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देत गर्दी होणार नाही, यासाठी नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.

इन्फो

मागल्या दाराने लसीकरण

शहरात रोज ५०० च्यावर लोक रांगेत उभे राहत असताना केवळ शंभरच्या आसपास लस उपलब्ध होत आहे. त्यातही राजकीय पुढारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या वशिल्याने अनेक जणांचे मागील दाराने लसीकरण केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे केंद्रांवर रोज वादविवादाचेही प्रसंग घडत आहेत. आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्याचेही प्रकार दिसून येत आहेत. जिल्हा प्रशासनाने सूत्रबद्ध पद्धतीने लसीकरणाची मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

फोटो- १७ दिंडोरी लसीकरण

आधी लसीकरणासाठी लोकांना आवाहन करावे लागत होते, आता लोक त्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत. दिंडोरी येथे लसीकरणासाठी नागरिकांची झालेली तोबा गर्दी पाहता कोरोना घालविण्याऐवजी त्याला निमंत्रणच दिले जात आहे.

170721\17nsk_29_17072021_13.jpg

फोटो- १७ दिंडोरी लसीकरणआधी लसीकरणासाठी लोकांना आवाहन करावे लागत होते, आता लोक त्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत. दिंडोरी येथे लसीकरणासाठी नागरिकांची झालेली तोबा गर्दी पाहता कोरोना घालवण्याऐवजी त्याला निमंत्रणच दिले जात आहे.

Web Title: Only one hundred vaccine beneficiaries, five hundred beneficiaries in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.