जनाधार नसलेल्यांनाच मिळतात पदे, रवींद्र पगार यांचा पक्षाला घरचा अहेर
By admin | Published: February 8, 2015 12:48 AM2015-02-08T00:48:43+5:302015-02-08T00:49:10+5:30
जनाधार नसलेल्यांनाच मिळतात पदे, रवींद्र पगार यांचा पक्षाला घरचा अहेर
नाशिक : पुणे येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या दोनदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनात जिल्हाध्यक्षांच्या प्रतिनिधींच्या वतीने नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांना बोलण्याची संधी मिळाली. त्यांनी उपस्थित नेत्यांना निवडणुकीच्या काळात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या अडचणींसह एकूणच पदाधिकारी नेमणुकीवर बोट ठेवले. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या राज्यस्तरीय संमेलनात संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांना बोलण्याची संधी देण्यात आली. यावेळी बोलताना पगार यांनी सांगितले की, निवडणुकांमध्ये पक्षाच्या विरोधी काम करणारे, फारसा जनाधार नसलेले, ज्यांच्या गावात पक्षाला मते मिळत नाही, असे लोक फक्त मुंबईला खेपा मारून नेत्यांच्या डाव्या-उजव्या बाजूला बसून प्रदेश पातळीवर पदे मिळवतात. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होते व कार्यकर्ता हतबल होतो. त्यामुळे प्रदेश पातळीवर नेमणुका करताना स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावे. विधानसभा व इतर निवडणुकांमध्ये उमेदवारी करणारे निवडणूक झाल्यानंतर कार्यकर्त्यांना विचारत नाही. ते थेट पुढच्या निवडणुकीच्या आधी काही दिवस कार्यरत होतात त्यामुळे कार्यकर्ते त्यांना स्वीकारण्यास तयार होत नाही. त्यामुळे पूर्ण वेळ पक्षाचे काम करणाऱ्यांचाच उमेदवारीसाठी विचार व्हावा. उमेदवारी लादली जाऊ नये. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य यांनी त्यांना विजयी होण्यासाठी जिवाचे रान करणारे पक्षाच्या कार्यकर्त्यांना विविध कार्यक्र मांमध्ये सहभागी करून घेऊन त्यांची प्रतिष्ठा वाढविली पाहिजे. राज्यात सर्वाधिक सभासद नोंदणी नाशिक जिल्'ात झाल्याचेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)