पावसाअभावी नाशिक जिल्ह्यात अवघ्या सहा टक्के पेरण्या !
By श्याम बागुल | Published: July 4, 2019 07:22 PM2019-07-04T19:22:14+5:302019-07-04T19:24:05+5:30
मान्सूनचे आगमन यंदा उशिराने का होईना, परंतु समाधानकारक असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकरी निर्धास्त होते. तथापि, संपूर्ण जून महिना उलटून गेल्यावरही मान्सूनने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी लावली नाही.
नाशिक : यंदा पावसाचे आगमन लांबणीवर पडून जिल्ह्यात जेमतेम १५ टक्केच पाऊस झाला असून, शेतात पेरणीयोग्य पाऊस अजूनही पडलेला नसल्यामुळे जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अवघ्या सहा टक्के पेरण्या होऊ शकल्या आहेत. पाऊस अजूनही पाहिजे त्या प्रमाणात न पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पेरण्यांमध्ये नऊपट घट झाल्याने कृषी क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात असून, अशीच परिस्थिती राहिल्यास कृषी उत्पादनात घट होण्याची भीती निर्माण झाली आहे.
मान्सूनचे आगमन यंदा उशिराने का होईना, परंतु समाधानकारक असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकरी निर्धास्त होते. तथापि, संपूर्ण जून महिना उलटून गेल्यावरही मान्सूनने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी लावली नाही. शिवाय यंदा अवकाळी पावसानेदेखील हूल दिल्यामुळे या पावसाच्या भरवशावर शेतीची मशागत करून वाट पाहणाºया शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. एरव्ही अवकाळी पावसामुळे शेतीची धूप निघण्यास मदत होऊन पहिल्या पावसानंतर शेतकरी पेरणीला प्राधान्य देतात, पण यंदा तशी वेळ आली नाही. जूनच्या शेवटच्या दिवसात पावसाने हजेरी लावली. साधारणत: दोन दिवस जिल्ह्याला झोडपून काढल्यानंतर पुन्हा पावसाने उघडीप दिल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात शेतीची धूप झाली नाही, किंबहुना शेत ओले झाले नाही. त्यातही काही तालुक्यांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाल्याने त्यांनी पेरणीला सुरुवात केली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील पेरणीयोग्य असलेल्या साडेपाच लाख हेक्टरपैकी अवघ्या ३३,३९५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या करण्यात आल्या असून, त्याचे प्रमाण ५.८० टक्के इतकेच आहे. गेल्या वर्षी १० जुलैपर्यंत जिल्ह्यात ३,४३,०७६ हेक्टरवर म्हणजेच ५३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. गेल्या वर्षाच्या तुलनेचा विचार करता यंदाची परिस्थिती चिंताजनक असून, पाऊस अशाच प्रकारे लांबणीवर पडला तर पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे.