सिन्नरला प्रवेशासाठी तीनच रस्ते खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 10:57 PM2020-05-19T22:57:31+5:302020-05-20T00:06:11+5:30
कोरोनाचा सामना करण्यासाठी शासनाने चौदा दिवसांचा चौथा लॉकडाउन जाहीर केल्यानंतर रस्त्यावर गर्दीचे प्रमाण वाढल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. सिन्नर पोलिसांनी सोमवारी (दि.१८) शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. केवळ तीन रस्ते प्रवेशासाठी खुले असून, यामुळे विनाकारण रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांना चाप बसणार आहे.
सिन्नर शहराच्या अवती-भोवती काही वेस पाहायला मिळतात. त्यातील सुस्थितीत असलेल्या आणि वर्दळीच्या भागातील वावीवेस प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अशा प्रकारे बंद करण्यात आली आहे.
सिन्नर : कोरोनाचा सामना करण्यासाठी शासनाने चौदा दिवसांचा चौथा लॉकडाउन जाहीर केल्यानंतर रस्त्यावर गर्दीचे प्रमाण वाढल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. सिन्नर पोलिसांनी सोमवारी (दि.१८) शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. केवळ तीन रस्ते प्रवेशासाठी खुले असून, यामुळे विनाकारण रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांना चाप बसणार आहे.
शासनाने चौथा लॉकडाउन जाहीर केल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लोक रस्त्यावर येणार नाहीत असे प्रशासनाला वाटले होते. मात्र, नेहमीपेक्षा जास्त लोक रस्त्यावर उतरले. त्यातच काही चप्पल-बूट विक्रेत्यांसह कापड विक्रेत्यांनी आपली दुकाने उघडल्याने खरेदीसाठी गर्दी उसळली. चौथा लॉकडाउन सुरु झाला असला तरी त्याबाबत शासनाकडून कुठल्याही मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंदच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, नाशिकमध्ये मेनरोडसह महात्मा गांधी मार्गावरील दुकाने उघडली असताना आमच्यावरच अन्याय का, अशी भावना व्यक्त करत व्यापाऱ्यांनी कुणाचीही परवानगी न घेता मंगळवारी दुकाने उघडली. त्यामुळे खरेदीसाठी गर्दीही रस्त्यावर उतरली. त्यामुळे पोलिसांनीच पुढाकार घेत कुणालाही न अडवता थेट रस्ते बंद करण्याची मोहीम हाती घेतली. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांनी स्वत: पुढाकार घेत जुन्या गावठाणातील वावी वेस, संगमनेर नाका-काजीपुरा, मारुती मंदिराच्या समोर, बँक आॅफ बडोदाकडून पडकी वेसकडे जाणारा रस्ता, आडवा फाटा, गंगावेस येथे थेट लाकडे व हातगाडे, बॅरिकेड्स लावून रस्ते प्रवेशासाठी बंद केले. पोलिसांची ही कारवाई सुरू असताना शहरात अफवांचे पीक आले. संशयित आढळल्याने सदर रस्ता बंद झाल्याची चर्चा झाली. मात्र, शहरातील सर्वच रस्ते बंद झाल्याचे कळल्यानंतर अफवांचे पीक थांबले. मात्र, पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने रस्ते बंद केल्याचे समजल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
प्रवेशासाठी सांगावे लागणार कारण
शहरातील गावठाण भागात जाण्यासाठी व बाहेर येण्यासाठी आता फक्त तीन रस्ते खुले राहणार आहेत. सिन्नर बसस्थानकापासून गावात येण्यासाठी रस्ता खुला असेल. मात्र, तेथे तैनात असलेल्या पोलिसांना गावात जाण्याचे कारण सांगावे लागणार आहे. गावात जाणे खरंच आवश्यक आहे असे वाटले तरच तेथून प्रवेश मिळेल. त्याशिवाय किराणा दुकानांसाठी माल घेऊन येणाºया वाहनांना तेथून प्रवेश करता येईल. तहसील कचेरीपासून नगर परिषदेकडे जाणारा रस्ताही खुला असेल. मात्र, तेथेही पोलीस तैनात असतील. गंगावेस भागातून नगर परिषदेकडे येणाºया रस्त्यानेही गावात येता येईल. याव्यतिरिक्त गावातल्या गावात अत्यावश्यक कामासाठी फिरण्यास कोणालाही मनाई असणार नाही.