मनपाच्या इंग्रजी माध्यमाच्या अवघ्या दोन शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 11:59 PM2019-07-13T23:59:27+5:302019-07-14T00:35:23+5:30
महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी त्याचे अनुकरण करण्यात आले आणि पाच शाळा सुरू करण्यात आल्या. परंतु नियोजनाचा अभाव, आर्थिक तरतूद नाही आणि पालकांची आर्थिक क्षमता नसल्याने पाचपैकी दोन शाळा आता नावाला सुरू आहेत.
नाशिक : महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी त्याचे अनुकरण करण्यात आले आणि पाच शाळा सुरू करण्यात आल्या. परंतु नियोजनाचा अभाव, आर्थिक तरतूद नाही आणि पालकांची आर्थिक क्षमता नसल्याने पाचपैकी दोन शाळा आता नावाला सुरू आहेत. इतकेच नव्हे तर अनेक शिक्षकांनी कामे करूनही त्यांना वर्षभरापासून वेतनच मिळत नसल्याने तेदेखील नाराज आहेत.
महापालिका शिक्षण मंडळ अस्तिवात असताना इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याची नवी संकल्पना राबविण्यात आली. पंचवटीतील मखमलाबाद नाका शाळेत केजीचे वर्ग सुरू करण्यात आल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर एकापाठोपाठ एक अनेक ठिकाणी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले. अर्थात, त्यासाठी महापालिका शिक्षण मंडळाला शिक्षण खात्याकडून अनुदान मिळाले नाही. स्वत:च्या आर्थिक बळावर शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण मंडळाने पालकांकडून शुल्क घेऊन त्यातून अस्थायी शिक्षकांचे मानधन देण्याचा प्रयोग सुरू केला. मात्र अनेक ठिकाणी पालक शुल्क देण्याच्या आर्थिक स्थितीत नसल्याने हा सर्व खर्च महापालिकेवरच पडला. त्यातच पुढील वर्गात इंग्रजी शाळांमध्ये मुलांना प्रविष्ट करताना शिक्षकांना अडचणी येऊ लागल्याने महापालिकेला इंग्रजी माध्यमाच्या शाळा बोजा वाटू लागल्या. त्यामुळे एकक करीत शाळा बंद पडत गेल्या आणि सध्या तर दोनच शाळा सुरू असून, त्यातदेखील विद्यार्थ्यांची संख्या अल्प आहे. खरे तर गेल्यावर्षीपासून सर्वच शाळा बंद करण्याची प्रशासनाची तयारी होती, मात्र प्रत्यक्षात तसे होऊ शकले नव्हते.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकवणाऱ्या अनेक शिक्षकांचे वर्षभरापासूनचे वेतन थकले असून, त्यांच्या म्हणण्यानुसार बारा महिन्यांचे वेतन थकले असले तरी प्रशासनाच्या म्हणण्यानुसार तीन महिन्यांचेच वेतन देणे बाकी आहे.
अन्यायाची भावना
महापालिकेने शिक्षकांच्या अपुºया संख्येमुळे मध्यंतरी काही शिक्षकांना कामावर घेतले होते. मात्र गरज संपल्यानंतर त्यांना तत्काळ कमी करण्यात आले असून, त्यांच्याकडून तसे बळजबरीने लिहून घेण्यात आले. अनेकांना तर त्यांनी अध्यापन केल्याचे सहा महिन्यांचे वेतनदेखील देण्यात आलेले नाही. त्यामुळे या अध्यापकांचीदेखील अन्याय झाल्याची भावना असून, किमान काम केल्याचे सहा महिन्यांचे तरी वेतन दिले पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. अंबड येथील चार शिक्षकांवर अशाप्रकारे अन्याय झाल्याचे सांगितले असून, तिघांनी महापालिकेकडे अर्ज करूनही उपयोग झाला नसल्याचे सांगण्यात आले.