चांदवड तालुक्यात एकमेव गाव कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:17 AM2021-04-30T04:17:27+5:302021-04-30T04:17:27+5:30
चांदवड : तालुक्यात ११२ गावे असून पहिल्या लाटेत १९ गावे कोरोनामुक्त होती. तर दुसऱ्या लाटेत ...
चांदवड : तालुक्यात ११२ गावे असून पहिल्या लाटेत १९ गावे कोरोनामुक्त होती. तर दुसऱ्या लाटेत जवळपास ११२ पैकी फक्त चिंचबारी ही एकमेव वाडी सोडली तर १११ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. चांदवड तालुक्यात आतापर्यंत ७१४८ रुग्ण संख्या असून ११० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. तर आतापर्यंत ६१७० रुग्ण बरे होऊन गेले आहेत. सध्या ८६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दूधखेड व नवापूर येथे पहिल्या लाटेत रुग्ण नव्हते. तर दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ८ रूग्ण आढळून आले आहेत. परंतु आता सर्व रु ग्ण बरे झाल्याने सद्यस्थितीत तेथे एकही रुग्ण नाही. पहिल्या लाटेत चिखलआंबे गाव कोरोनामुक्त राहिले होते. तर दुसऱ्या लाटेत चिखलआंबे येथे आतापर्यंत तीन व्यक्ती कोरोना बाधित झाल्या आहेत. पहिल्या लाटेच्या वेळी अगदी कडक लॉकडाऊन असल्याने बाहेरील कोणीही व्यक्ती गावात येत नव्हती. गावातील कोणीही व्यक्ती बाहेर जात नव्हती. पहिल्या लाटेच्या वेळी लोकांमध्ये कोरोनाची दहशत होती. मात्र, आता लोक बिनधास्त झाले आहेत.
काळखोडे येथे पहिल्या लाटेत फक्त एक रुग्ण होता. तर दुसऱ्या लाटेत आतापर्यंत २५ रुग्ण आढळून आले आहेत . सद्यस्थितीत सहा रुग्ण ॲक्टीव्ह आहेत. गावातील ग्रामस्थांनी पहिल्या लाटेनंतर कोरोना विषाणूकडे दुर्लक्ष केल्याने गावात पुन्हा कोविड रुग्ण जास्त संख्येने आढळून आलेले आहेत.
पहिल्या लाटेत बोराळे गाव कोरोनामुक्त राहिले होते. तर दुसऱ्या लाटेत बोराळे येथे आतापर्यंत पाच व्यक्ती कोरोनाबधित झाल्या असल्याची माहिती सरपंच जिजाबाई किसन जाधव यांनी दिली. मात्र, हे रुग्ण आता पूर्णपणे बरे झाले आहेत. पहिल्या लाटेत उर्धुळ गावात ११ रुग्ण होते. तर दुसऱ्या लाटेत उर्धुळ येथे आतापर्यंत ११५ व्यक्ती कोरोनाबधित झाल्या आहेत. सरपंच कविता श्रीहरी ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या लाटेच्या वेळी लोकांमध्ये कोरोनाची भीती होती. परंतु आता लोकांनी कोरोनाबाबत वेळेवर दक्षता घेतली नाही. त्यामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला. आज रोजी गावात तीन रु ग्ण संख्या आहे.
हिरापूर गावात ६ रु ग्ण होते. दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ६० व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याचे सरपंच रंगनाथ धोंडीराम थोरात यांनी सांगितले.
इन्फो
डोणगावी शून्यावरून सतरा
डोणगाव येथे पहिल्या लाटेत शून्य रुग्ण संख्या होती. तर दुसऱ्या लाटेत आतापर्यंत १७ रुग्ण सापडले असल्याचे सरपंच मुरलीधर यशवंत शेळके यांनी सांगितले. ग्रामपंचायतीने गावात रॅपिड ॲंटीजेन टेस्टचा कॅम्प दोन वेळा लावला व लसीकरणही करत कोरोनाला बऱ्यापैकी आटोक्यात आणल्याचेही ते म्हणाले. वागदर्डी या गावात पहिल्या लाटेत एक रुग्ण होता. दुसऱ्या लाटेत ९५ रुग्ण असल्याची माहिती वागदर्डीच्या सरपंच अलका कौतीक पवार यांनी दिली. गंगावे पहिल्या लाटेत कोरोनामुक्त होते तर दुसऱ्या लाटेत रुग्ण आढळून आले आहेत. दुसऱ्या लाटेत शासनाचे निर्बंधास ग्रामस्थांनी उशिरा प्रतिसाद दिला. आता कोरोना नियंत्रणात आहे.