निवृत्तिनाथांच्या समाधीला उटीचा लेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 01:30 AM2021-05-08T01:30:23+5:302021-05-08T01:31:19+5:30
सलग दुसऱ्याही वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर संत निवृत्तीरायांच्या संजीवन समाधीला परंपरेनुसार शुक्रवारी (दि.७) चंदनाच्या उटीचे लेपन करण्यात आले. दरवर्षी वरुथिनी एकादशीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे उटीची वारी तथा मिनी निवृत्तीनाथ महाराज यात्रा भरत असते. यंदा मात्र, कोरोनामुळे ही यात्रा रद्द करून मोजक्या भाविक व विश्वस्तांच्या उपस्थितीत हा विधी पार पाडण्यात आला.
त्र्यंबकेश्वर : सलग दुसऱ्याही वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर संत निवृत्तीरायांच्या संजीवन समाधीला परंपरेनुसार शुक्रवारी (दि.७) चंदनाच्या उटीचे लेपन करण्यात आले. दरवर्षी वरुथिनी एकादशीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे उटीची वारी तथा मिनी निवृत्तीनाथ महाराज यात्रा भरत असते. यंदा मात्र, कोरोनामुळे ही यात्रा रद्द करून मोजक्या भाविक व विश्वस्तांच्या उपस्थितीत हा विधी पार पाडण्यात आला.
दरवर्षी त्र्यंबकेश्वरला वरुथिनी एकादशीला मोठी यात्रा भरते, पण मागच्या वर्षी प्रमाणे या वर्षीही निवृत्तीनाथ महाराज यांची उटीची वारी प्रशासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्र्यंबकला येणाऱ्या वारकरी भाविकांना यात्रेला येण्यापासून परावृत्त करण्यात आले. मात्र, परंपरेप्रमाणे देवाचे दैनंदिन सोपस्कार, पूजा-अर्चा, आरती, पुष्पांजली सोहळा भक्तिभावाने करण्यात आला.
शुक्रवारी दुपारी टाळ-मृदंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात संत निवृत्तीनाथरायाच्या संजीवन समाधीला थंडगार शीतल व सुगंधी चंदनाच्या उटीचा लेप पुजारी सुरेश गोसावी, जयंत गोसावी, योगेश गोसावी, ह.भ.प. सच्चिदानंद महाराज गोसावी तसेच मंदिराचे प्रशासक तथा धर्मादाय उपायुक्त कृष्णा सोनवणे, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव,
विश्वस्त भाऊसाहेब गंभीरे, के.एम. पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, व्यवस्थापक गंगाराम झोले आदींच्या उपस्थितीत देण्यात आला. यावेळी मोजकेच भाविक उपस्थित होते.
चाचणी नंतरच प्रवेश
प्रशासनाने उटी सोहळ्याच्या एक दिवस आधी सोहळ्यात सहभागी होणारे अतिथी, मंदिराचे पुजारी तसेच कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करुन अहवाल निगेटिव्ह असणाऱ्यांनाच सहभागी होण्याची परवानगी दिलेली होती. संस्थानने फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण करुन भाविकांना घरबसल्या या सोहळ्याचे दर्शन घडविण्याची सोय केलेली होती.