त्र्यंबकेश्वरला उटीची वारी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 10:23 PM2020-04-13T22:23:50+5:302020-04-13T23:07:03+5:30
त्र्यंबकेश्वर येथे येत्या शनिवारी (दि. १८) फाल्गुन कृ. ११ वरुथिनी एकादशीला भरणारी उटीची वारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या विश्वस्त मंडळाने घेतला आहे.
त्र्यंबकेश्वर : येथे येत्या शनिवारी (दि. १८) फाल्गुन कृ. ११ वरुथिनी एकादशीला भरणारी उटीची वारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या विश्वस्त मंडळाने घेतला आहे. मात्र, परंपरा खंडित होऊ न देता केवळ औपचारिकता म्हणून येथे होणारी उटीची वारी साधेपणाने व घरगुती वातावरणात पुजारी व विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तसेच मोजकेच विश्वस्त सोशल डिस्टन्सिंग ठेवून दुपारी उटी चढवून रात्री ती उतरविली जाणार आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या आदेशाचा आदर करून केवळ गर्दी होऊ नये म्हणून यावर्षी संत निवृत्तिनाथ महाराज यांची लाखोच्या संख्येने भरणारी उटीची वारी (मिनी यात्रा) रद्द करण्याचा निर्णय श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या विश्वस्त मंडळाने घेतला असल्याचे प्रसिद्धिपत्रक विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांनी काढले आहे. वारीच्या पार्श्वभूमीवर उटी उगाळण्यास तीन-चार दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. एरवी उटी उगाळण्यास चैत्र कृ. ५ (पंचमी)पासूनच सुरुवात केली जाते. मात्र यावर्षी उटी उगाळण्यास कोणाला न बोलविता फक्त पुजारी घराण्यानेच उटी उगाळण्यास सुरुवात केली आहे. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांची उटीची वारी म्हणजे मिनी निवृत्तिनाथ यात्राच असते. या पार्श्वभूमीवर संत निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधीला उन्हाचा दाह कमी व्हावा म्हणून सुगंधी चंदनाच्या उटीचा लेप चढवितात. सध्या निवृत्तिनाथ समाधी मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असून, उटीच्या वारी पूर्वी संत निवृत्तिनाथ मंदिराच्या कळसाचे काम पूर्ण होईल, असा विश्वस्त मंडळाचा प्रयत्न होता. तथापि कळसाच्या कामासाठी हवा असलेला अखंड दगड उपलब्ध होउ शकला नाही. सध्या वाहतूकही बंद असल्याने मंदिर जीर्णोद्धारासाठी कोल्हापूर येथून काळा पाषाण आणता येत नाही.