ग्रामीण भागात ग्रामस्थांचा मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 12:08 AM2020-03-29T00:08:38+5:302020-03-29T00:09:08+5:30
खामखेडा : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदीचे आदेश देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातदेखील संचारबंदीचे आदेश देण्यात आल्याने नगर, महानगरात प्रशासनाला नियंत्रण मिळविता आले आहे. लोक किमान घरामध्ये थांबले आहेत. संपर्क टळू लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामखेडा : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदीचे आदेश देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातदेखील संचारबंदीचे आदेश देण्यात आल्याने नगर, महानगरात प्रशासनाला नियंत्रण मिळविता आले आहे. लोक किमान घरामध्ये थांबले आहेत. संपर्क टळू लागला आहे.
याउलट चित्र ग्रामीण भागातील काही गावांमध्ये दिसून येत असून, पारांवर गप्पांचे फड रंगल्याचे आणि ग्रामस्थांचा मुक्त संचार सुरू आहे. पोलीस प्रशासनाने शहरी भागातील गस्त वाढविली मात्र खेडोपाडी पोलिसांचा वॉच नसल्याने लोक घोळक्याने बसत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. साथ आटोक्याबाहेर गेल्यास ग्रामीण जीवनाच्या अघळपघळ सवयींमुळे मार्ग खडतर मानला जात आहे.
ग्रामीण भागात घरे छोटी छोटी व जवळ जवळ असतात. संपूर्ण गाव हे एका घरासारखे असते. साहजिकच सर्वांचे एकमेकांशी उठणे बसणे असते. अद्याप ग्रामीण भागात या विषाणूचा संसर्ग झालेला नाही. शिवाय ग्रामीणमध्ये काही गावांत तेवढे गांभीर्यानेही घेतले गेले नाही. त्यामुळे लोक सकाळ-संध्याकाळी घोळक्या-घोळक्याने बसत आहेत.
शाळांना सुटी असल्याने लहान मुले सर्रास गावभर खेळत आहे. ही बाब अत्यंत घातक ठरू शकते. ग्रामीण भाग हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत भाग आहे. शिवाय शेतकरी, शेतमजुरांचा भरणा या भागात जास्त आहे. या ठिकाणी साथ पोहोचल्यास ती घराघरात पोहचायला वेळच लागणार नाही. खेड्यातील जीवन हे एकमेकांशी निगडित आहे. पुणे-मुंबई किंवा इतर शहरातून गावी येणाºया लोकांची संख्यादेखील लक्षणीय आहे. या लोकांची आरोग्य केंद्रात नोंद करून त्यांची तपासणी केली जात आहे आणि त्यांना घरी बसण्याचा सल्ला देऊन इतरांच्या संपर्कात येऊ नका असे सांगितले जात आहे तरीदेखील काही लोक बाहेर वावरताना दिसून येत आहे. ग्रामीण भागातही सक्तीच्या उपाययोजना न केल्यास शहरांपेक्षाही हा भाग सर्वाधिक भरडला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.