मराठी भाषिक राज्यांमध्ये पोहोचेल मुक्त विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:14 AM2021-01-23T04:14:36+5:302021-01-23T04:14:36+5:30

नाशिक: देशात मराठी माणूस जेथे असेल तेथे मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करून तेथील मराठी माणसाला शिक्षणाची संधी ...

Open universities will reach Marathi speaking states | मराठी भाषिक राज्यांमध्ये पोहोचेल मुक्त विद्यापीठ

मराठी भाषिक राज्यांमध्ये पोहोचेल मुक्त विद्यापीठ

Next

नाशिक: देशात मराठी माणूस जेथे असेल तेथे मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करून तेथील मराठी माणसाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. गोवा राज्यात याबाबतचा पहिला पायलट प्रोजेक्ट राबविला जाणार आहे. याबाबतची प्रकिया सुरू झाली असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी नाशिक दौऱ्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तसेच पुणे विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विद्यापीठाचा विस्तार वाढविण्यासंदर्भात आढावा घेतल्याचे सांगितले. गोवा राज्यात असलेल्या मराठी भाषिकांसाठी तेथे उपकेंद्र सुरू करण्याबाबत प्रक्रिया सुरू असून, तेथील मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे सामंत यांनी सांगितले. ज्या ज्या ठिकाणी मराठी माणसे आहेत त्यांच्या शिक्षणासाठी मुक्त विद्यापीठाची केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे दिल्ली, कोलकाता यासारख्या मेट्रो शहरातही मुक्त विद्यापीठा पोहोचणार आहे.

तंत्रशिक्षणाशी संंबंधित जे अभ्यासक्रम आहेत, त्यांची यूजीसीने परवानगी नाकारली असली तरी राज्य पातळीवर अशा अभ्यासक्रमांना मंजुरी देण्याबाबतचा विचारविनिमय सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय मुक्त विद्यापीठाच्या काही अभ्यासक्रमासंदर्भात आलेल्या तक्रारींबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचेही सामंत यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, नाशिक शहरात मुक्त विद्यापीठाच्या अद्ययावत उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध‌ करून देण्यासाठी आपण स्वत: मनपा आयुक्तांशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रासाठी दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथील जागेचा ताबा विद्यापीठाला मिळालेला आहे. येथील कामासाठी विद्यापीठ निधीतून दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. ज्या दोन सर्व्हे क्रमांकाचा वाद नाही तेथे काम सुरू करण्यास कोणतीही अडचण नाही. यासाठी येत्या १५ एप्रिलनंतर निविदा काढल्या जातील, असेही सामंत यांनी सांगितले.

--इन्फो--

..तर दोषींवर कारवाई

पुणे विद्यापीठातील परीक्षेतील गोंधळासंर्भात सायबर क्राइमकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात समितीदेखील स्थापन करण्यात आलेली आहे. या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर राज्यपालांच्या परवानगीने प्रसंगी गुन्हादेखील दाखल केला जाईल. असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

Web Title: Open universities will reach Marathi speaking states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.