मोदींच्या डिजिटल इंडियात ‘मुक्त विद्यापीठ’
By admin | Published: April 6, 2017 01:27 AM2017-04-06T01:27:44+5:302017-04-06T01:27:58+5:30
‘डिजिटल इंडिया’ अभियानात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला ‘डिजिटल साक्षरता‘ उपक्रमाची जबाबदारी स्वीकारण्याची संधी प्राप्त झाल्याने मुक्तचाही सहभाग लक्षणीय ठरणार आहे
संदीप भालेराव नाशिक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘डिजिटल इंडिया’ अभियानात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला ‘डिजिटल साक्षरता‘ उपक्रमाची जबाबदारी स्वीकारण्याची संधी प्राप्त झाल्याने मोदींच्या डिजिटल मोहिमेत मुक्तचाही सहभाग लक्षणीय ठरणार आहे. ज्ञानगंगा घरोघरी पोहोचविण्याच्या कार्याची दखल घेऊन केंद्राच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सुचनेनुसार मुक्त विद्यापीठाकडे ग्रामीण डिजिटल साक्षरतेची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने मुक्त विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १ जुलै रोजी देशात ‘डिजिटल इंडिया’ अभियानाची सुरुवात केली. देशातील प्रशासनात लोकांचा सहभाग वाढावा त्याबरोबरच देशाला माहिती तंत्रज्ञानावर आधारित अर्थसत्ता बनविण्याची घोषणा मोदी यांनी केली आहे. या अभियानांतर्गत देशात डिजिटल साक्षरता निर्माण करण्यासाठी व्यापक कार्यक्रम आखण्यात आला असून, महाराष्ट्रात ज्या काही संस्थांची मदत
घेण्यात आली आहे. त्यामध्ये मुक्त विद्यापीठाचाही समावेश
करण्यात आलेला आहे. त्यामुळे केंद्राच्या योजनेत थेट योगदान देण्याचा मान मुक्त विद्यापीठाला मिळाला आहे.
डिजिटल इंडियाच्या घोषणेनंतर देशाच्या ३६ राज्यांमध्ये आणि ६०० जिल्ह्यांमध्ये पोहोचून तेथील जनतेला डिजिटल साक्षर करण्याचा कार्यक्रम या अभियानात आखण्यात आलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात तंत्रज्ञान म्हणजेज डिजिटल सेवेच्या बाबतीत नागरिकांना साक्षर करण्याची जबाबदारी मुक्त विद्यापीठाने उचलावी यासाठीचा प्रस्ताव डिजिटल इंडियाच्या सहयोगी संस्थेने दिला आहे. मुक्त विद्यापीठाने ही संधी स्वीकारण्याची मानसिकता केली असून, विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीसमोर सदर प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर कार्यक्रमाची आखणी केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेसुसार महाराष्ट्रातील प्रत्येक घरात एक तरी व्यक्ती तंत्रज्ञान साक्षर व्हावी असा उद्देश आहे. या मोहिमेत मुक्त विद्यापीठाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने तळागाळात पोहोचलेल्या विद्यापीठाने किमान ४५ लाख व्यक्तींना ‘डिजिटल साक्षर’ करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या आधारावरील हे प्रशिक्षण देण्यासाठीची संपूर्ण तयारी करण्याची विद्यापीठाची तयारी आहे. याबाबतच कालबद्ध कार्यक्रम आखला जाणार असून, देशाच्या मोहिमेत सहभागी होण्याची संधी म्हणून राज्यातील या डिजिटल साक्षरता अभियानात मुक्त विद्यापीठ सहभागी होणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत मुक्त विद्यापीठ पोहचले आहे. सुमारे सहा लाखापेक्षा अधिक
विद्यार्थी संख्या, त्यांचे विविध अभ्यासक्रम, परीक्षा, अभ्याससाहित्य, तंत्रज्ञानाचा वापर यांचा वापर करून विद्यापीठ ज्ञानदानाचे कार्य करीत असल्याने मुक्त विद्यापीठाला या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे.