मुक्त विद्यापीठाच्या सत्र परीक्षा मे महिन्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:13 AM2021-04-19T04:13:00+5:302021-04-19T04:13:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सत्र परीक्षा मे महिन्यात ऑनलाईन स्वरूपात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सत्र परीक्षा मे महिन्यात ऑनलाईन स्वरूपात होणार आहेत. विद्यापीठातर्फे या परीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले असून, या वेळापत्रकात समावेश असलेल्या शिक्षणक्रमांच्याच परीक्षा मे महिन्यात होणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रावर दूरगामी परिणाम झाले आहेत. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाने पहिली ते नववी व अकरावीच्या तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षाही रद्द करून विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश दिला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्याही १९ एप्रिलला होणाऱ्या परीक्षा २ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याशिवाय अन्य विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने डिसेंबर २०२०मध्ये प्रलंबित राहिलेल्या परीक्षा आता मे महिन्यात ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना लिंकद्वारे परीक्षा प्रणालीत सहभागी होता येणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना याच लिंकच्या माध्यमातून सराव परीक्षेची सुविधाही विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे.
इन्फो-
अशी होईल ऑनलाईन परीक्षा
ऑनलाईन परीक्षा सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागेल. त्यासाठी प्रथम कायम नोंदणी क्रमांक (पीआरएन) टाकावा लागेल. स्क्रीनवर दिसणारे नाव बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर विद्यार्थ्याला स्वत:ची जन्मतारीख टाकावी लागणार आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर एक तासाचा कालावधी मिळेल. ही परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार असून, सकाळ सत्रात सकाळी आठ ते दुपारी एक आणि दुपारच्या सत्रात तीन ते आठ अशी वेळ उपलब्ध असेल. परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रोग्राम कोडनुसार पेपर किती तारखेला कुठल्या वेळी, कुठल्या लॉग इन स्लॉटमध्ये आहे, हे पाहून विद्यार्थ्याने पुरेशा वेळेआधी परीक्षेला सुरुवात करावी. विद्यार्थांना परीक्षेचा स्लॉट टाईम पाच तासांचा असला, तरी प्रत्यक्ष परीक्षेसाठी वेळ साठ मिनिटांचा देण्यात येणार असून, परीक्षेत ५०पैकी ३० प्रश्न साठ मिनिटात सोडवावे लागणार आहेत. या प्रत्येक प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे साठ गुणांची परीक्षा होणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.