जुन्या मार्केट यार्डात खुलेआम ओल्या पार्ट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 05:41 PM2019-07-27T17:41:06+5:302019-07-27T17:41:28+5:30
पिंपळगाव बसवंत : बाजारसमितीत घाणीचे साम्राज्य
पिंपळगाव बसवंत : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ असल्याची पिंपळगाव शहराची ओळख आहे. परंतु, १०० एकर जागेवर नवी बाजार समिती कार्यरत झाल्यानंतर बाजार समितीच्या जुन्या आवारात खुलेआम ओल्या पार्ट्या रंगत असून परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याकडे प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.
पिंपळगाव बसवंत शहराचा आठवडे बाजार रस्त्यावर भरत होता पण ग्रामपंचायत प्रशासनाने तो जुन्या बाजार समितीच्या आवारात सुरू केला. त्यामुळे शहरातील गर्दी आणि वाहतूक कोंडीला आळा बसला. पण जुन्या बाजार समिती आवारात सुरू झालेल्या आठवडे बाजाराला विदुप स्वरूप प्राप्त होत असून जागोजागी घाणीचे साम्राज्य, खड्यात पाणी साचून मच्छरांची पैदास मोठया प्रमाणात झाली आहे. त्याचा भाजीपाला विक्र ी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्केट यार्डात खुलेआम ओल्या पार्ट्या रंगत असून ठिकठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच दिसून येतो. बाजार समिती प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. बाजार समितीकडून केवळ करवसुलीला प्राधान्य दिले जात असून तेथील सोयीसुविधा व सुरक्षिततेकडे काणाडोळा केला जात आहे. त्यामुळे तळीरामांचे फावते आहे. याठिकाणी जुगार अड्डा बनल्याने महिलांसाठीही असुरक्षित वातावरण तयार झाले आहे.