सत्ताधारीच बनले विरोधक
By किरण अग्रवाल | Published: October 7, 2018 01:33 AM2018-10-07T01:33:47+5:302018-10-07T14:11:44+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना शह देण्याच्या नादात भाजपाचे पदाधिकारी आपण स्वत: सत्तेत असल्याचे विसरून विरोधकाची भूमिका पार पाडू लागल्याने खऱ्या विरोधकांना आणखी काय हवे? पण या शह-काटशहाच्या राजकारणात नाशिककरांच्या जिवावर बेतते आहे, हे मात्र दुर्दैवीच म्हणायला हवे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना शह देण्याच्या नादात भाजपाचे पदाधिकारी आपण स्वत: सत्तेत असल्याचे विसरून विरोधकाची भूमिका पार पाडू लागल्याने खऱ्या विरोधकांना आणखी काय हवे? पण या शह-काटशहाच्या राजकारणात नाशिककरांच्या जिवावर बेतते आहे, हे मात्र दुर्दैवीच म्हणायला हवे.
नाशिक शहर व जिल्ह्यातही फैलावू पाहत असलेल्या साथीच्या रोगांनी नागरिक भयभीत झाले आहेत. डेंग्यूबाधितांची संख्या या वर्षात पाचशेपेक्षा अधिक झाली असून, गेल्या महिन्यात दोन मृत्युमुखी पडले आहेत. तर स्वाइन फ्लूचे दीडशेपेक्षा अधिक रुग्ण आढळले असून, सात जणांचा मृत्यू घडून आला आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनातर्फे बैठकांवर बैठका घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत; परंतु त्या पुरेशा पडताना दिसत नाहीत. अशात आयुक्त तुकाराम मुंढे ‘वॉक विथ कमिशनर’ कार्यक्रम घेतात म्हणून त्यांना शह देण्यासाठी महापौर रंजना भानसी यांनीही ‘महापौर तुमच्या दारी’ कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे. खरे तर असे करण्यात नावीन्य काही नाहीच. यापूर्वीच्या महापौरांनी असे उपक्रम राबवून झाले आहेत; परंतु केवळ आयुक्तांना शह देण्यासाठीच त्याची योजना केली गेल्यामुळे स्वाभाविकच प्रश्नाची तड लावण्यापेक्षा प्रशासनावर आरोप करण्यात समाधान मानले जाताना दिसून येत आहे. त्यामुळे नाशिकरोड परिसरातील रुग्णालये व शाळांना दिलेल्या भेटीत व तेथे आढळलेल्या अव्यवस्थेबाबत प्रशासनाला आरोपीच्या पिंजºयात उभे करताना सदरचे प्रशासन सत्ताधारी म्हणून आपल्याला राबविता आले नाही याची कबुलीच जणू महापौरांनी देऊन टाकली. सत्ताधारी असूनही प्रशासन ऐकत नसेल व वारंवार प्रशासनाला कारवाईचे इशारे देण्याची वेळ येत असेल तर सत्ताधारी व पदाधिकारी म्हणून भाजपाचा वचक उरला नाही, हेच त्यातून निष्पन्न होणारे आहे.