नाशिक महापालिकेच्या महासभेत सफाई कामगारांच्या आऊटसोर्सिंग प्रस्तावाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 09:14 PM2018-01-10T21:14:43+5:302018-01-10T21:16:34+5:30
प्रस्ताव तहकूब : सत्ताधारी भाजपाची भूमिका मात्र अनुकूल
नाशिक - महापालिकेत स्वच्छता विषयक कामांसाठी ७०० सफाई कामगारांची भरती आऊटसोर्सिंगद्वारे करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला विरोधकांनी कडाडून विरोध दर्शविला तर सत्ताधारी भाजपाने प्रस्तावाचे समर्थन केले. मात्र, विरोधाची धार पाहता महापौरांनी सावध भूमिका घेत प्रस्ताव तहकूब ठेवत अभ्यासांतीच निर्णय घेण्याचे जाहीर केले.
महापालिकेत सफाई कामगारांची आऊटसोर्सिंगद्वारे भरती करण्याचा अशासकीय प्रस्ताव यापूर्वी आरोग्य समितीचे सभापती सतीश कुलकर्णी यांनी मांडला होता. मात्र, अशासकीय प्रस्तावावर तांत्रिकदृष्टया कार्यवाही करणे अवघड असल्याने आयुक्तांमार्फत सदरचा प्रस्ताव बुधवारी (दि.१०) झालेल्या महासभेवर आणण्यात आला. यावेळी रिपाइंच्या दीक्षा लोंढे यांनी सदरच्या प्रस्तावाला तिव्र विरोध दर्शवत स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्याची मागणी केली. सतिश कुलकर्णी यांनी शहरात सफाई कामगारांची अपुरी संख्या लक्षात घेता आऊटसोर्सिंगद्वारे भरतीचे समर्थन केले. म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष व सेना नगरसेवक प्रवीण तिदमे यांनीही आऊटसोर्सिंगद्वारे भरतीला विरोध दर्शवत भरतीचा प्रयत्न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. उद्धव निमसे यांनी सफाई कामगारांच्या कमतरतेमुळे एकाच कर्मचाºयावर कामाचा ताण पडत असल्याने भरती आवश्यक असल्याचे सांगितले. भाजपा गटनेता संभाजी मोरूस्कर यांनी जोपर्यंत शासनाकडे प्रलंबित असलेला आकृतिबंध मंजूर होत नाही तोपर्यंत आऊटसोर्सिंगद्वारे भरती करण्याची मागणी केली. मात्र, भरती करताना कंत्राटदाराला नाशिकच्याच भूमिपुत्रांना रोजगार देण्याची अट घालण्याची सूचना केली. सेनेचे चंद्रकांत खाडे यांनी यापूर्वी कंत्राटी पद्धतीने भरती केलेल्या कामगारांना मनपा सेवेत सामावून घेण्यात आल्याचा दाखला देत सदर भरती प्रक्रिया आऊटसोर्सिंगऐवजी मानधनावर करण्याची सूचना केली. मुशीर सैय्यद यांनीही भरतीचे समर्थन केले. गुरूमित बग्गा यांनी पेस्ट कंट्रोल ते घंटागाडीपर्यंत सर्व ठेकेदारी पध्दतीची बोंबाबोंब असल्याने थेट किंवा मानधनावर सफाई कर्मचाºयांची भरती करण्याची मागणी केली. सुषमा पगारे यांनी ठेकेदाराचे कामगार हे आत्मीयतेने काम करत नाही, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे आऊटसोर्सिंगला विरोध असल्याचे सांगितले. राहूल दिवे यांनी मागासवर्गीय गटातील बेरोजगारांचा विचार करुन आऊटसोर्सिंग करु नये अशी सूचना केली. सुधाकर बडगुजर यांनी आऊटसोर्सिंगद्वारे भरती करुन पारंपरिक व्यवसाय करणा-यांवर अन्याय करु नका, असे सुनावले. विरोधीपक्षनेता अजय बोरस्ते यांनी आऊटसोर्सिंगला शिवसेनेचा विरोध असल्याचे सांगत मनपाच्या गेटपासून सभागृहापर्यंत माझ्या हातात विविध संघटनांची पाच निवेदने पडली. यावरुन जनमत लक्षात घ्यावे. शिवाय हा विषय जादा पत्रिकेत ठेवला त्यामुळे त्याचाही त्यांनी निषेध केला. यावेळी शांता हिरे, वत्सला खैरे यांनीही मत व्यक्त केले तर लोकसंख्येच्या तुलनेत सफाई कामगार कमी आहे. कायदेशीर भरती प्रक्रिया प्रशासनाच्या चुकीमुळे झाली नाही. सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेण्याची सूचना सभागृहनेता दिनकर पाटील यांनी केली. अखेर सभागृहाचा नूर पाहून महापौर रंजना भानसी यांनी आऊटसोर्सिंग भरतीचा प्रस्ताव तहकूब ठेवला.
कॉँग्रेस गटनेत्याचा सभात्याग
कॉँग्रेस गटनेते शाहू खैरे यांनी सांगितले, अत्यंत महत्त्वाचा असलेला सफाई कामगार भरतीचा विषय जादा विषय म्हणून सभागृहात ठेवण्यात आला.तर मेहतर-मेघवाळ समाजाच्या तरुणांना सभागृहामधील गॅलरीचा प्रवेश नाकारण्यात आला. आऊटसोर्सिंगचा बट्याबोळ झालेला असताना पुन्हा अट्टहास का, असे सांगून खैरे यांनी सभात्याग केला.